मुंबई : काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याने रिक्त धारावी विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून कारकीर्द सुरू करण्यासाठी तब्बल १८ इच्छुकांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे अर्ज दिले आहेत. यात वर्षा गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड आणि बंधू तुषार गायकवाड या दोघांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे.
त्याचवेळी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष संदेश कोंडविलकर हे देखील मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी ज्योती गायकवाड यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आला आहे. डॉक्टर ज्योती गायकवाड गिरीगोसावी ह्या पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. सायन आयुर्वेदिक महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्या धारावीत सक्रिय झाल्या आहेत. वर्षा गायकवाड यांच्या लोकसभा निवडणूक प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती. अनिल देसाई यांना लोकसभेसाठी धारावीमध्ये प्रचार करण्याची संपूर्ण यंत्रणा त्यांनी राबवली. त्यामुळे लोकसभा निवडणुकी दरम्यानच अनिल देसाई यांनी त्यांना धारावीच्या विधानसभेच्या उमेदवार म्हणून जाहीर केले होते.