Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकोल्हापूरहातकणंगले लोकसभा शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांची उमेदवारी धोक्यात ? मानेचे सडेतोड...

हातकणंगले लोकसभा शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांची उमेदवारी धोक्यात ? मानेचे सडेतोड उत्तर

कोल्हापूर : राज्यामध्ये सध्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान शिंदे गटाचे लोकसभेचे दोन उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. शिंदे गटाचे हातकणंगले येथील धैर्यशील माने व हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे. शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी उमेदवार बदलण्याची संकेत दिले होते. यानंतर चर्चांना उधाण आले असून राजकारण रंगलेले दिसत आहे. या प्रकरणावर विद्यमान खासदार व शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणताही बदल आता होणार नाही असे ठाम मत धैर्यशील माने यांनी व्यक्त केले आहे.
उमेदवारी बदलण्याच्या चर्चांवर सडेतोड उत्तर

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शिंदे गटाचे उमेदवार बदलले जातील असे संकेत दिले होते. एखादा उमेदवार कमजोर वाटत असेल, तर मुख्यमंत्री शिंदे असा उमेदवार कधीही बदलू शकतात, शक्यता नाकारता येत नाही, असेही शिरसाट यांनी सांगितले. यानंतर राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागल्या. यावर धैर्यशील माने प्रतिक्रिया देत म्हणाले, “चर्चा या फक्त चर्चा असतात. त्यामध्ये काहीही अर्थ नसतो. अशा प्रकारच्या चर्चा माझ्या उमेदवारीच्या आधीही सुरू होत्या. ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत मी गेलो आहे. त्यामुळे माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे मला उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवार बदलण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे असतील मात्र त्यांनी कोणत्याही लोकसभा उमेदवाराचं नाव घेतलेले नाही. उमेदवार बदलायचा असता तर उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच बदलला असता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणताही बदल आता होणार नाही. संभ्रम निर्माण करायची वेळ आता राहिलेली नाही. त्यामुळे काल एक एप्रिल होतं एप्रिल फूल म्हणून कार्यकर्त्यांनी विसरून जावं,” असे आवाहन उमेदवार धैर्यशील माने यांनी केले आहे.
नाव स्वाभिमानी ठेवून स्वाभिमान जागृत होत नाही
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ भूमिका घेतली आहे. तरी हातकणंगले मतदारसंघासाठी महाविकास आघाडी राजू शेट्टीसोबत चर्चा करत आहेत. यावरुन उमेदवार धैर्यशील माने यांनी निशाणा साधला आहे. खासदार माने म्हणाले, “समोरच्या उमेदवाराला अद्याप पक्ष आणि दिशा सापडेना झाली आहे. त्यांची ससेहोलपट होत असून वैचारिक घालमेल होत आहे. एखाद्या वधूला नवरा पाहिजे पण त्याचे आई-वडील नको अशी परिस्थिती आहे. एकदा ‘एकाला चलो रे’ म्हणतात तर एकदा तुमचं चिन्ह घ्यायला तयार आहे असे हे म्हणतात. स्वतःकडे स्वाभिमान असेल तर दुसऱ्याच्या पाठिंबासाठी ते पायऱ्या का झिजवत आहेत. स्वाभिमान असेल आणि लाचारी पत्करायचे नसेल तर कोणाशी चर्चा करायचा संबंध येत नाही. नाव स्वाभिमानी ठेवून स्वाभिमान जागृत करता येत नाही त्यासाठी स्वाभिमानाने राहावं लागत. ते एका भूमिकेशी कधीही ठाम राहिले नाहीत. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे मतदार संघातील प्रत्येक मतदाराने पाहिले आहे,” असा घणाघात धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यावर केला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments