प्रतिनिधी : टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर उत्साहात असलेल्या टीम इंडियाला आता नवीन कोच मिळाला आहे. गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने ही घोषणा केली आहे. गौतम गंभीर राहुल द्रविडची जागा घेईल. टीम इंडियाने टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राहुल द्रविडने आपला प्रवास तिथेच संपवला होता.
गौतम गंभीर हा गेल्या महिन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर होता. गौतम गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 2024 च्या आयपीएल किताबावर नाव कोरलं. केकेआरच्या या विजयानंतरच गौतम गंभीर हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होईल, अशी चर्चा रंगली होती. आता बीसीसीआयने गौतम गंभीरच्या नावावर शिक्कमोर्तब केलं आहे.
कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन झाल्यानंतर बीसीसीआय गौतम गंभीरच्या संपर्कात होती. त्यानंतर गौतम गंभीर याने औपरचारिकपणे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात बीसीसीआयच्या अॅडवायजरी कमिटीने त्याचा इंटरव्यूही घेतला होता. यानंतर गौतम गंभीरच्या नावाची फक्त औपचारिक घोषणाच बाकी होती.
गौतम गंभीरचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा 31 डिसेंबर 2027 म्हणजे साडेतीन वर्षांचा असेल. राहुल द्रविड नोव्हेंबर 2021 मध्ये टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला होता. त्याला 2 वर्षांचा कार्यकाळ दिला होता. द्रविडचा कार्यकाळ हा वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनललाच संपला होता. पण बीसीसीआयने टी20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढ दिली होती.