मुंबई : वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांच्या मुलाला अटक करण्यास तीन दिवस का लागले. मुंबई पोलिसांची तुलना जगप्रसिद्ध स्कॉटलंड यार्डशी केली जाते अशा मुंबई पोलीस दलाला आरोपी तीन दिवस सापडत नाही यावर विश्वास बसणे कठीण आहे. आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का? असा सवाल विचारून आता आरोपीची वैद्यकीय चाचणी केली तर तो दारु प्यायला होता हे निष्पन्न होणारच नाही त्यासाठीच जाणीवपूर्वक तीन दिवसाने त्याला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीवर १०३ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी वरळी अपघातातील पीडित प्रदीप नाखवा यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर या संपर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, या अपघाताने नाखवा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, अपघात होऊन तीन दिवस झाले तरी सरकारच्या एकाही प्रतिनिधीने नाखवा कुटुंबाची भेट घेतलेली नाही. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारने सर्व प्रयत्न तर केलेच पाहिजेत पण नाखवा कुटुंबालाही भरघोस मदत करून आधार दिला पाहिजे. आज नाखवा कुटुंबाला आधाराची गरज आहे पण सरकारने त्याकडे लक्ष दिलेले नाही. या अपघातातील मुख्य आरोपी हा धनदांडग्याचा मुलगा आहे आणि सत्ताधारी शिंदेसेनेशी संबंधित आहे.अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही दाबण्यात आले आहे, हे फुटेज बाहेर आले तर देशभरात मोठा आक्रोश निर्माण झाला असता. हे सर्व पाहता आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे परंतु आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच नाखवा कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.