सातारा : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनीच सातारा शहरातील त्यांच्या स्मृतींची उपेक्षा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साताऱ्यातील मध्यवर्ती पोवई नाका येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून साधा पुष्पहारही अर्पण करण्यात आला नसल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत तसेच देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सहकार, शिक्षण, कृषी आणि औद्योगिक विकासाला दिशा देणाऱ्या या महान नेतृत्वाचा गौरव आजही केला जातो. मात्र, त्यांच्याच जिल्ह्याच्या मुख्यालयात पुण्यतिथीच्या दिवशी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची साधी औपचारिकताही पार पडली नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
राजकीय भाषणांमधून यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारंवार उल्लेख केला जातो; मात्र प्रत्यक्ष कृतीतून त्यांच्या स्मृतींचा सन्मान राखला जात नसल्याची टीका नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीपुरते अभिवादनाचे सोपस्कार न करता त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श जपणे आवश्यक असल्याचेही मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, पुतळ्याला पुष्पहार नसल्याचे लक्षात येताच परिसरातील जागरूक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पुष्पहार अर्पण करून स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. यापुढे अशा महत्त्वपूर्ण दिवसांचे विस्मरण होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने पोवई नाका येथील पुतळ्यावर नियमित देखभाल तसेच जयंती व पुण्यतिथीदिनी अधिकृत अभिवादनाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी सातारकरांकडून होत आहे.




