वेळू (कोरेगाव – विजय जाधव) या गावात ‘पहिला मारला की पाणी..!’ सुखदेव तात्या भोसले यांचे हे दहा वर्षांपूर्वीचे शब्द आजही वेळू गावातील जलसंधारणाच्या यशाची साक्ष देत आहेत. २०१६ मध्ये पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या या गावाने श्रमदान, लोकवर्गणी आणि लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामांचे सकारात्मक परिणाम दशकानंतरही अनुभवले जात आहेत.
२०१६ मध्ये अवघ्या ४५ दिवसांत ग्रामस्थांनी जलसंधारणाची प्रभावी कामे केली. या कामासाठी गावाला ५० लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आणि मुख्यमंत्र्यांकडून २० लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले होते. डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कामांनी गावाच्या पाणी व्यवस्थापनाला नवी दिशा दिली.
आज पावसाचे प्रमाण अवघे १८० मिलिमीटर असतानाही ओढे, तलाव, बंधारे आणि विहिरींमध्ये पाणी उपलब्ध आहे. हातपंपाला एकदा उपसा मारला की पाणी येते, ही परिस्थिती जलसंधारणाच्या दूरगामी परिणामांची प्रचिती देते.
दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारण आणि वृक्षसंवर्धन हाच प्रभावी मार्ग आहे. वेळू गावाचा हा अनुभव इतर गावांसाठीही प्रेरणादायी असून, पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.
या , पहा आणि तुम्ही करुन दाखवा

दुष्काळी झळा सोसलेल्या वेळू गावाने काळाची गरज ओळखून श्रमदान, लोकवर्गणी आणि लोकसहभागातून जलसंधारण, वृक्षसंवर्धन, उपलब्ध पाणीचा ताळेबंद, नियोजन केले.
दहा वर्षांपूर्वीची मेहनत आजही पाणी देत आहे. वेळू गावाने केलेली कामे पाहण्यासाठी या आणि तुमच्या गावात तुम्ही करु शकता. गावाच्या परिसरात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शक्य ते प्रयत्न गावाने करावे लागतील. यासाठी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुखदेव भोसले ( वेळू) यांनी केले.




