प्रतिनिधी : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी मोठे विधान केले आहे. सरकारकडून कोणत्याही दबावाला तोंड देण्याचा प्रसंग आपल्यावर आलेला नाही. मी 24 वर्षांपासून न्यायाधीश म्हणून काम करत आहेत. परंतु कधीही कोणत्याही राजकीय दबावाखाली काम केले नाही, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. ऑक्सफर्ड युनियनच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात त्यांनी ही माहिती दिली. न्यायव्यवस्थेवर विशेषत: गेल्या काही वर्षांत कुठला राजकीय दबाव होता का? असा प्रश्न यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना विचारण्यात आला होता.
राजकीय दबाव म्हणजे सरकारकडून कोणत्याही प्रकारचा दबाव तुम्हाला म्हणायचा असेल, तर तुम्हाला स्पष्टच सांगतो. मी 24 वर्षे न्यायाधीश आहे. सरकारच्या कोणत्याही दबावाला मला कधीच सामोरे जावे लागले नाही, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. लाइव्ह लॉने हे वृत्त दिले आहे.
तुमचा अर्थ व्यापक राजकीय दबाव असेल, तर न्यायाधीशाला त्याच्या निर्णयाच्या राजकीय परिणामाची जाणीव असते. तसेच आपल्या निर्णयाचे काय राजकीय परिणाम होणार आहेत, याची जाण न्यायाधीशांना असली पाहिजे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.
सोशल मीडिया एक मोठी समस्या बनत चालला आहे. प्रत्येकजण स्वतःला पत्रकार समजू लागला आहे. त्याची सर्वाधिक बळी हे न्यायाधीश ठरत आहेत. मी कधी बोललो नसेल, अशी वक्तव्य सोशल मीडियावर दिसून येतात, असे सांगत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी चिंता व्यक्त केली आहे.