सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व स्वातंत्र्यसेनानी किसन वीर आबासाहेब यांच्या विचारांचा वारसा असणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे रणशिंगे फुंकले आहे. यंदाच्या निवडणुकीत राजकीय कुस बदलल्यामुळे विचारांचे वारसदार बदलले आहेत. सध्या सातारा जिल्हा बँकेत सातारा जिल्ह्यातील नामांकित चौदा घराण्यांच्या सत्तेसाठी घुमशान सुरू झाले आहे. अर्धा सातारा जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. सत्तेमधील प्रस्थापित घराणे जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी मुसळधार पाऊस कोसळावा तशा पद्धतीने एकमेकांच्या गाठीभेटी घेऊन प्रसारमाध्यमाला दुष्काळ विसरण्यास भाग पाडत आहे. हीच मोठी चिंतेची बाब असल्याचे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या प्रामुख्याने भोसले, नाईक-निंबाळकर , पाटील घराण्याचे मोठे वर्चस्व राहिले आहे. त्यांनी उभी केलेली प्यादी सुद्धा संचालक झालेली आहेत. सहकार चळवळीमध्ये राजकारण आणू नका. असे प्रत्येक वेळी सांगितल्यानंतर राजकीय हालचालीला वेग येत आहे.राजकीय पक्षांचा विचार केल्यास या बँकेवर दीर्घकाळापासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकहाती नियंत्रण राहिले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अनेक प्रस्थापित मंडळींनी सहभाग घेतला होता. उद्याच्या काळात संचालक मंडळात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकर, बोपेगावचे पाटील व बोराटवाडीचे गोरे बंधू हे निर्णायक भूमिकेत दिसणार आहेत.
कराडचे माजी मंत्री दिवंगत विलासराव उंडाळकर यांचे या बँकेवर तब्बल ४० वर्षे एकहाती वर्चस्व होते. त्यांनी ५० वर्षांपेक्षा जास्त काळ बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले होते. त्यांचे चिरंजीव अँड उदयसिंह पाटील उंडाळकर हे सध्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सामील झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या बँकेत सध्या भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. महायुती म्हणून जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यास महायुतीतील घटक पक्ष तयार आहेत. त्यासाठी सामान्य कार्यकर्ते ऐवजी प्रस्थापित घराण्यातील लोकांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळामध्ये एकूण २१ संचालक आहेत. या २१ संचालकांमध्ये अध्यक्ष – नितीन लक्ष्मणराव पाटील, उपाध्यक्ष -अनिल शिवाजीराव देसाई आणि इतर १९ संचालकांचा समावेश होणार आहे. यामध्ये सहकारातील कार्यकर्त्यांच्या चर्चेनुसार काही नावे नमूद करायचे झाले तर
नितीन जाधव (पाटील),अनिल देसाई, रामराजे नाईक-निंबाळकर ,श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले , सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील), ,प्रभाकर घार्गे किंवा इंदिरा प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे किंवा रूपाली राजेंद्र राजपुरे, सुनील माने, सुरभी मदन भोसले,
शेखर गोरे, ज्ञानदेव रांजणे, राजेंद्र तांबे, शशिकांत शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, भाजप आमदार मनोज घोरपडे, शिवांजली राजे नाईक निंबाळकर, आमदार डॉक्टर अतुल भोसले, अरुण पवार, माजी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार सदाशिव सपकाळ, प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे, योगेश फडतरे व राजेश्वरी रणजीत सिंह देशमुख , मोनल संजय साळुंखे अशा नावांनाच प्राधान्य मिळणार आहे. आणखीन काही पडद्यामागे सूत्र हलवत असल्याने वेगळ्या नावाचाही विचार होऊ शकतो. या व्यतिरिक्त अनेकांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत.
राजकीय तडजोड म्हणून काहींना संधी असून सुद्धा डावलले जाणार आहे. तर काहींना संचालक होण्याचा मान मिळणार आहे. या सर्व घडामोडी मध्ये प्रत्यक्ष शेतात राबणारे सामान्य शेतकरी नसले तरी त्यांची काळजी घेणारे काळजीवाहू प्रस्थापित चौदा घराण्यातील संचालक होणार असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना आनंद वाटत आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये राजकारणात अडीचशे घराणे आहेत. त्यांनी इतर ठिकाणी आपले बस्तान चांगलेच बांधले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी ते उत्सुक होतील पण संधी मिळणार नाही. याची त्यांना खात्री वाटत आहे. त्यामुळे ज्या गावाला जायचं नाही. त्या गावाची वाट कशाला विचारा? अशी प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, उद्या एक ऑक्टोबर हा शेवटचा अर्ज स्वीकारण्याचा दिवस असल्याने अनेक पडद्यामागचे सूत्रधार अर्ध दाखल करतील. त्यानंतर माघार घेण्यासाठी अनेकांची विनंती करावी लागणार तर काहीजण नाटक करतील. त्या नंतरच नाटकाचा दुसरा अंक सुरू होणार आहे.
——————————–




