मुंबई(साबीर शेख) : TMC तर्फे २६ जुलै २०२६ रोजी घेण्यात आलेल्या लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदाच्या परीक्षेबाबत कथित पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील संभाव्य अनियमिततेच्या चर्चेला उधाण आले आहे. प्रश्नपत्रिका अत्यंत गोपनीय ठेवण्याची प्रक्रिया असतानाही प्रश्नपत्रिकेची प्रत सहज उपलब्ध झाल्याचा दावा काही स्तरांतून केला जात असल्याने, या दाव्यांची सत्यता नेमकी काय आहे, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत असल्याची माहिती समोर येत आहे.
भरती प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा पारदर्शक आणि नियमबद्ध असणे ही उमेदवारांच्या भवितव्याबरोबरच संस्थेच्या विश्वासार्हतेचीही महत्त्वाची बाब असते त्यामुळे प्रश्नपत्रिका छपाई, सुरक्षित साठवणूक, परीक्षा केंद्रांपर्यंत वाहतूक, वितरण आणि परीक्षा व्यवस्थापनापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
कथित पेपरफुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिकेचा प्रवास ,गोपनीयता,सुरक्षा, नियंत्रण, प्रश्नपत्रिकांच्या प्रतींची संख्या , सुरक्षित ठिकाण आणि परीक्षा केंद्रांपर्यंत त्यांचे वितरण कशा पद्धतीने झाले, या बाबी तपासणे आवश्यक असल्याने या बाबतीत TMC ने पुरावे उपलब्ध करून द्यायला हवे अशी मागणी होत आहे.
या संदर्भात TMC अधिकारी जॉर्ज, डॉ. गुप्ता व म्हात्रे यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. यांच्याकडे प्रश्नपत्रिका निर्मितीपासून छपाई, सुरक्षित साठवणूक, वितरण तसेच परीक्षा व्यवस्थापनातील गोपनीयता आणि सुरक्षा प्रक्रियेबाबत प्रतिक्रियेतून उत्तर स्पष्ट होत नसून या संदर्भात सक्रिय शिष्टमंडळ मुख्य कार्यालयाला भेट देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जाणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. दरम्यान जनहित भावना समजून या संपूर्ण प्रक्रियेबाबत अधिकृत आणि स्पष्टता उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा केली जात आहे.
कथित पेपरफुटीच्या दाव्यांची सत्यता केवळ तोंडी चौकशीपुरती मर्यादित न ठेवता सर्व्हर लॉग, ऑनलाइन लॉगिन रेकॉर्ड, प्रश्नपत्रिका तयार करण्याशी संबंधित डिजिटल नोंदी, प्रिंटिंग रेकॉर्ड, वितरणाची नोंद, प्रवेश नियंत्रण प्रणाली, CCTV फुटेज तसेच उपलब्ध अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे सुरक्षित करून त्यांची तांत्रिक तपासणी झाल्यास पारदर्शक कारभार व अधिक सक्षम पणे कर्मचारी निवड प्रक्रिया भरती होत असल्याची प्रभावी अंमलबजावणी व्यवस्थापन म्हणून योग्य ठरली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या कथित आरोपांचे समाधान व्हावें साठी स्वतंत्र समिती किंवा निष्पक्ष चौकशी यंत्रणा नियुक्त करून परीक्षेच्या निष्पक्षतेवर परिणाम झाला का, याची वस्तुनिष्ठ पडताळणी व्हावी, अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, यापूर्वीच्या TMC तर्फे LDC भरती प्रक्रियेबाबतही तक्रारी आणि शंका उपस्थित झाल्याचा दावा करण्यात आला होता. HRD विभागाशी संबंधित अधिकाऱ्याच्या ओळखीतील व्यक्तीच्या मुलाची निवड झाल्याच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर संबंधित निवड रद्द करून भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आल्याची कथित माहिती सूत्रांकडून सांगितली जात आहे.
मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप स्पष्ट झालेली नसून, संबंधित प्रकरणातील चौकशीचा निष्कर्ष आणि अधिकृत कागदोपत्री माहिती प्रशासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सद्य चर्चेतील आरोप आणि पूर्वीच्या तक्रारी यांचा परस्पर संबंध आहे का, याबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी स्वतंत्र पडताळणी होणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेत मानवी आरोग्याशी संबंधित उपचार, निदान, संशोधन आणि वैद्यकीय सेवा यासाठी पात्र व कुशल मनुष्यबळाची निवड केली जाते. त्यामुळे अशा संस्थेच्या भरती प्रक्रियेबाबत कोणताही संशय निर्माण झाल्यास त्याची गंभीर, निष्पक्ष आणि पुराव्यावर आधारित चौकशी होणे ही संस्थेची विश्वासार्हता टिकविण्यासाठी आवश्यक बाब ठरल्याचे बोलले जात आहे.
भरती प्रक्रियेवरील विश्वास हा हजारो उमेदवारांच्या भवितव्याशी जोडलेला असतो म्हणून केवळ आरोप किंवा चर्चेच्या आधारे कोणत्याही व्यक्तीला अथवा संस्थेच्या कारभारावर शंका उपस्थित करणे, दोषी ठरविणे योग्य नसून कथित माहितीमागील सत्य-असत्य, अनियमितता झाली किंवा नाही आणि भरती प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला किंवा नाही, हे अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट व्हावे अशी चर्चा हि होत आहे.
यासाठी संबंधित शासकीय प्राधिकरण तसेच विश्वस्त मंडळाने या चर्चेची गांभीर्याने दखल घेऊन स्वतंत्र चौकशीबाबत निर्णय घ्यावा, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक व कागदोपत्री पुरावे सुरक्षित ठेवावेत आणि चौकशीचा निष्कर्ष शक्य तितका पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात विविध माध्यमे, पत्रकार,राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच अन्य क्षेत्रांतील घटकांकडून अधिकृत माहिती आणि कागदोपत्री पुराव्यांची पडताळणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. सत्य समोर यावे, दोषी असल्यास कारवाई व्हावी आणि निर्दोषांवर अन्याय होऊ नये, हीच नागरिकांची प्रमुख अपेक्षा असल्याचे या चर्चेतून अधोरेखित होत आहे.




