रायगड-अलिबाग : पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या ३२६ किमी लांबीच्या आणि २० हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या तीन महत्त्वपूर्ण टप्प्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण करण्यात आले. यावेळी जेएनपीटी येथून डबल-स्टॅक कंटेनर मालगाडीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
या मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती मिळणार असून, मुंबई परिसरातून मालवाहतुकीचा वेग आणि क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एका मालगाडीमधून २५० हून अधिक ट्रकइतका माल वाहून नेता येणार असल्याने वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वेसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्याने दररोज ४३० हून अधिक मालगाड्या धावू शकतील. ट्रकने सुमारे ३० तास लागणारा प्रवास रेल्वेमार्गे १० ते १२ तासांत पूर्ण होण्याची शक्यता असून, इंधन बचत, प्रदूषणात घट आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे. कृषी उत्पादनांची देशभरातील बाजारपेठांमध्ये जलद वाहतूक शक्य होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी समर्पित मालवाहतूक मार्गिका नेटवर्क पूर्ण होणे ही ऐतिहासिक उपलब्धी असल्याचे सांगितले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गिकेमुळे जेएनपीटीची मालवाहतूक क्षमता वाढणार असल्याचे नमूद केले. २०३० पर्यंत जेएनपीटी हे दशलक्ष टीईयूंपेक्षा अधिक क्षमता असलेले देशातील पहिले बंदर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.




