मुंबई — धारावी झोपडपट्टीवासियांना ५०० चौ.फु.ची घरे- दुकाने मिळालीच पाहिजे.आणि सर्व पात्र-अपात्र झोपडपट्टीवासियांचे धारावीतच पुनर्वसन झाले पाहिजे या मागणीचा पुनरुच्चार करण्यासाठी आज हजारो धारावीकर रस्त्यावर उतरले.धारावी बचाव आंदोलन या संघटनेच्या वतीने आज स्वातंत्र्यदिनी सायंकाळी पावणे चार वाजता भव्य ‘धारावी बचाव तिरंगा रॅली’ काढण्यात आली.या रॅली वेळी स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
भारत माता की जय, वंदे मारतम अशा घोषणा देत तिरंगे झेंडे फडकवीत ही रॅली धारावीतील रहिवाशी आणि धारावी बचाव आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी काढली.संविधान चौक, मुकुंद नगर, सायन बांद्रा लिंक रोड, धारावी मेन रोड,धारावी कोळीवाड़ा, धारावी पोस्ट ऑफिस, चमड़ा बाजार, बड़ी मस्जिद, ईरानी होटल, क्रॉस रोड, आकाश वाड़ी गेट या मार्गे या रॅलीचा समारोप शिवनारायण बावडीजवळ एनसीपी-शप कार्यालयावर झाला.
कोण म्हणतो घेणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही.घर के बदले घर…दुकान के बदले दुकान… देना होगा… देना…. होगा…., कोई नही जाएगा,कोई नही जाएगा, धारावी के बाहर नही जाएगा, पाचसौ फूट का हम अधिकार मांग रहे है, भिक नही मांग रहे है.
सरकार- डीआरपी होशियार मे आवो अशा गगनभेदी घोषणांनी आज संपूर्ण धारावी दणाणून गेली होती.शेवटी राष्ट्रगीताने या रॅलीची समाप्ती झाली.
धारावी बचाव तिरंगा यात्रेच्या प्रमुख मागण्या
धारावीतील सर्व रहिवाशांना पात्र करुन त्यांना घर दुकाने धारावीतच द्यावी, एसआरए मार्फत धारावीकरांना नोटीसा देऊन कागदपत्रे जमा करण्यासाठी धमक्या देणे बंद करा, धारावीमध्ये व्यावसायिकांना गोदामांच्या बदल्यात गोदामे द्यावी, कुंभारवाडा, कोळीवाड्यांचा विकास करताना त्यांच्या पारंपरिक व्यवसायास धक्का लावू नये.एकाही धारावीकराचे देवनार मुलुंड डंपिंग ग्राउंडवर पुनर्वसन नको.
धारावी बचाव तिरंगा यात्रेचे नेतृत्व धारावी बचाव आंदोलन नेते समन्वक माजी आमदार बाबुराव माने, कॉम्रेड राजू कोरडे, कॉम्रेड नसीरूल हक,राष्ट्रवादी शपचे उल्लेश गाजाकोश,आपचे पॉल राफेल,आरपीआयचे अनिल कसारे आदींनी केले.रॅलीत श्यामलाल जैसवार, राहुल गायकवाड़, समीर मगरू, अंसार शेख, आयुब शेख, कलम भाई, शेकाप पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या साम्या कोरडे, माया जाधव,सुरेश सावंत आदींसह हजारो धारावीकर या रॅलीत तिरंगे झेंडे घेऊन सहभागी झाले होते.
पात्र-अपात्रचा सुरु खेळ बंद करा: बाबुराव माने
धारावीत सरकारने झोपड्यांना पात्र-अपात्र करण्याचा सुरु केलेला खेळ ताबडतोब बंद करावा .आणि सरसकट सर्वच धारावीकरांना ५०० चौ.फू.ची घरे धारावीतच द्यावी आणि हे लेखी आश्वासन राज्य सरकारने द्यावे.आणि गुंडांच्या मार्फत धमक्या देण्याचे आणि झोपड्या तोडण्याचा धंदा बंद करण्यात यावा असा इशारा धारावी बचाव आंदोलनचे नेते माजी आमदार बाबुराव माने यांनी दिला आहे.
धारावीवासियांसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या सायन रेल्वे पुलाचे काम वेगाने करण्यात यावे अन्यथा धारावी बचाव आंदोलनच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही माने यांनी दिला.
७५० चौ.फू.ची घरे द्या:राजू कोरडे
शाहूनगर,माटुंगा लेबर कॅम्प,काळा किल्ला,शिव शक्ती नगर,म्युनिसिपल चाळ,नवी चाळ आदी ठिकाणी इमारती, चाळीत राहणाऱ्या लोकांना झोपडपट्टीवासिय न समजता त्यांना ७५० चौ.फू.चे घरे देण्यात यावी अशी मागणी शेकापचे राजू कोरडे यांनी केले.
एसआरएचा कायदा काय आहे ? जेथे झोपडपट्टी तेथेच झोपडपट्टीचा पुनर्विकास. पण अदानीसाठी राज्य सरकारने कायदा बदलला आहे. असा आरोप राष्ट्रवादी शपचे धारावी तालुका अध्यक्ष उल्लेष गजाकोश यांनी केला आहे.धारावीतील एकही रहिवाशी धारावी बाहेर जाणार नाही.सर्व पात्र-अपात्र झोपड्यांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे असेही उल्लेश गजाकोश म्हणाले.




