ताज्या बातम्या

आई-वडिलांच्या संस्कारांची जपणूक करत कर्तृत्व सिद्ध करा : मनोज सानप यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२६ सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

नवी मुंबई : यशवंतराव चव्हाण फाउंडेशन व यशवंतनीती वृत्तपत्राच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२६ सोहळा नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब येथे उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या सोहळ्यात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप होते. यावेळी युवा नेते,नगरसेवक अमित चौगुले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवी मुंबई चंद्रकांत चाळके, यशवंतनीतीचे संस्थापक-अध्यक्ष व संपादक संजय सावंत, संघटक सुभाष बावडेकर, उद्योजक रामदास शिंगारे, पत्रकार भीमराव धुळप यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आदर्श माता सन्मान पुरस्कार सौ. आनंदीबाई शिंगारे यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींना यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मनोज सानप म्हणाले की, “स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपण खरोखरच भारतीय म्हणून आपले कर्तव्य पार पाडतो का, याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. आपण भारतीय असल्याचा अभिमान व्यक्त करतो; मात्र रस्त्यावर प्लास्टिक, गुटख्याच्या पुड्या आणि कचरा फेकताना आपण आपल्या देशाप्रती असलेले कर्तव्य विसरतो. देशप्रेम केवळ घोषणांमध्ये न राहता आपल्या कृतीतही दिसले पाहिजे.”
आई-वडिलांच्या संस्कारांमुळे आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळते, असे सांगताना सानप यांनी आपल्या जीवनातील एक प्रसंगही उपस्थितांसमोर मांडला. ते म्हणाले, “एकेकाळी मी मुंबईत बिल्डर म्हणून काम करत होतो आणि १५ इमारती बांधल्या. मात्र एका प्रसंगानंतर माझ्या आई-वडिलांनी मला एक विनंती केली. त्यांच्या शब्दांचा विचार करून मी एका रात्रीत बांधकाम व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ८९ लाख रुपयांचे नुकसान झाले; मात्र आई-वडिलांच्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू माझ्यासाठी त्या ८९ लाखांपेक्षा कितीतरी मोठे होते.”
पदावर किंवा खुर्चीवर बसताना आपली नियत स्वच्छ राहावी आणि आपल्या कृत्यांमुळे आई-वडील, पत्नी, मुले, मित्र आणि गुरुजनांची मान खाली जाऊ नये, अशी प्रार्थना आपण करतो, असेही त्यांनी सांगितले.
पुरस्कारांच्या वाढत्या व्यावसायिकीकरणावर भाष्य करताना सानप म्हणाले की, “आज पुरस्कारांबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र या सोहळ्यात पुरस्कार मिळविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तृत्व आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहता हा सन्मान त्यांच्या कार्याची दखल घेऊनच केला गेला आहे, असा माझा विश्वास आहे.”
आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवणे आणि समाजाला काहीतरी देण्याची वृत्ती जोपासणे गरजेचे आहे, असे सांगून त्यांनी तरुणांना आवाहन केले. “व्यक्ती श्रीमंत असली तरी तिच्याकडे देण्याची क्षमता नसेल तर त्या संपत्तीचा उपयोग नाही. एखाद्याकडे काहीच नसले तरी इतरांसाठी काही करण्याची भावना मोठी असू शकते. त्यामुळे तरुणांनी आपल्या आई-वडिलांना आपले मूळ मानून त्यांचा आदर करावा आणि समाजासाठी सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न करावा,” असे सानप म्हणाले.
यावेळी अमित चौगुले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील पुरस्कारार्थी, मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Scroll to Top