मुंबई : मल्लिकार्जून खरगे यांचा अपमान मनुवादी प्रवृत्तीने करून आपल्या घाणेरड्या व बुरसटलेल्या विचाराचे प्रदर्शन केले आहे. मनुवाद्यांकडून हजारो वर्षांपासून दलित समाजाला हीन वागणूक दिली जात आहे. आजही या विचाराचे लोक त्याच मानसिकतेत आहेत. समाजातील ही वागणूक संपुष्टात यावी व समान वागणूक मिळावी यासाठीच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आरक्षण दिले आहे. मल्लिकार्जून खर्गेजी यांचा अपमान हा सर्व मागासवर्गीय समाजाचा व संविधानाचा अपमान आहे तसेच काँग्रेस नेतृत्वाचा अपमान कदापी सहन करणार नाही, अशा संतप्त भावना यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांनी व्यक्त केली.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमधील हल्दवानी येथे जाहीर सभा घेतली होती, त्यासभेनंतर श्रीराम सेनेने त्या सभास्थळाचे शुदधीकरण केले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सहा जिल्ह्यात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करून जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी मनुवादी प्रवृत्तींच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या अशी माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.
दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जिल्हाध्यक्ष रविकांत बावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तर दक्षिण मध्य मुंबईचे अध्यक्ष कचरू यादव यांच्या अध्यक्षतेखाली चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. उत्तर मध्य मुंबईत मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा अध्यक्ष अर्शद आझमी यांच्या उपस्थितीत कलेक्टर हॉल वांद्रे पूर्व येथे, उत्तर पश्चिम मुंबईच्या जिल्हाध्यक्ष भावना जैन यांच्या नेतृत्वाखाली चार बंगला येथे, उत्तर पूर्व मुंबईचे जिल्हाध्यक्ष केतन शहा यांच्या नेतृत्वाखाली माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व येथे तर उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजपती यादव यांच्या नेतृत्वाखाली दामुनगर कांदिवली येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




