ताज्या बातम्या

आचार्य अत्रे यांना वरळी नाका येथे अभिवादन; ज्येष्ठ संपादक पराग करंदीकर यांना समितीच्या वतीने पुरस्कार घोषित 

मुंबई (रवींद्र मालुसरे) : संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२८ व्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या वरळी नाका येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ज्यांच्या नावाचा उच्चार होताच मराठी माणसाच्या डोळ्यांसमोर एकाच वेळी लेखक, पत्रकार, वक्ता, शिक्षक, नाटककार, चित्रपटकार आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारा योद्धा उभा राहतो.
महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता, शैक्षणिक आणि राजकीय जीवनावर आपल्या कर्तृत्वाची अमिट छाप पाडणाऱ्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्याविषयी भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या.
सन २०२६ चा ज्येष्ठ संपादक कै. काकासाहेब पुरंदरे सन्मान पुरस्कार यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्री. पराग करंदीकर यांना पत्रकारितेतील बहुमोल योगदानाबद्दल जाहीर करण्यात आला, त्याची घोषणा समितीच्या अध्यक्षा ॲड आरती पुरंदरे सदावर्ते यांनी यावेळी केली.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याप्रसंगी आचार्य अत्रे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी अत्रे कुटुंबीय ॲड राजेंद्र व ॲड बिना पै, संपादक महेश म्हात्रे, प्राध्यापक विसुभाऊ व सौ उमाताई बापट, पत्रकार शिबानी जोशी, शरद बरडे, श्रीकांत मयेकर, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, दीपक देवगोंडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची पूर्वतयारी आणि सूत्र संचालन अरविंद भोसले यांनी केले.
Scroll to Top