कराड : नागरिकांच्या विविध मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाविरोधात अधिकारी महासंघ, कराड यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. १२ ऑगस्टपासून प्रमुख मागण्यांसाठी प्रशासनाला सवाल उपस्थित करण्यात आले असून, नागरिकांच्या समस्यांवर तातडीने ठोस कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
कराड शहर व तालुक्यात दरमहा ९०० हून अधिक नागरिक व लहान मुले कुत्रे चावण्याच्या घटनांना बळी ठरत असल्याचा दावा महासंघाने केला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुसज्ज निवारा केंद्र उभारावे, तेथे कुत्र्यांच्या निवास व खाद्याची योग्य व्यवस्था करावी आणि वेळोवेळी लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा
स्व. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर व नर्सिंगची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. १०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येत असून प्रसूती सेवांवरही मोठा ताण असल्याचे महासंघाने निदर्शनास आणले आहे.
रुग्णालयात आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध असतानाही कर्मचारी व तज्ज्ञ मनुष्यबळाअभावी आयसीयू विभाग बंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आयसीयू सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी आहे. तसेच चतुर्थ श्रेणीतील कंत्राटी कर्मचारी तसेच सफाई कर्मचाऱ्यांची बाह्ययंत्रणेद्वारे तातडीने भरती करून स्वच्छता व्यवस्था सुधारावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेवर नाराजी
कराड शहर व एस.टी. स्टँड परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दररोज नियमित स्वच्छता व देखभाल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोल्हापूर नाका परिसरात अद्ययावत सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे. तसेच संगम घाट परिसरात माता-भगिनींसाठी तातडीने हिरकणी कक्ष उभारावा आणि तेथील स्वच्छतागृह कायम स्वच्छ व सुस्थितीत ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
“आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई हवी!”
नागरिकांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याऐवजी प्रशासनाने प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका अधिकारी महासंघाने घेतली आहे. “आश्वासन नको—प्रत्यक्ष कारवाई हवी!” असा स्पष्ट इशारा देत मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.




