संगमनेर : कनिष्ठ महाविद्यालयांतील तासिका ४५ मिनिटांवरून ४० मिनिटे करण्याचा निर्णय, प्रात्यक्षिकांच्या बॅचमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे तसेच शिक्षक भरतीऐवजी विद्यमान शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याच्या धोरणाविरोधात छात्र भारतीच्या वतीने संगमनेरमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. छात्र भारतीचे अध्यक्ष अनिकेत घुले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती न झाल्याने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांवर नवीन शिक्षकांची भरती करण्याऐवजी विद्यमान शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप छात्र भारतीने केला.
कनिष्ठ महाविद्यालयातील ४५ मिनिटांची तासिका ४० मिनिटे करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे दररोजचे अध्यापनाचे नुकसान होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. तसेच विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिकांची २० विद्यार्थ्यांची बॅच ३० विद्यार्थ्यांची करण्याचा निर्णयही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला बाधक असल्याचा आरोप करण्यात आला.
कला शाखेतील वैकल्पिक विषयांच्या कमी करण्यात आलेल्या तुकड्या पूर्ववत सुरू कराव्यात, विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिकांसाठी विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवावी, तासिका पूर्ववत ४५ मिनिटांच्या कराव्यात आणि शिक्षकांची नवीन भरती करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
“शिक्षक भरती करायची सोडून विद्यमान शिक्षकांना अतिरिक्त करून विद्यार्थ्यांचे नुकसान का केले जात आहे?” असा सवाल छात्र भारतीने उपस्थित केला. शिक्षणाचे खाजगीकरण थांबवून सरकारी शिक्षण व्यवस्था मजबूत करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
विद्यार्थी, पालक, शिक्षक संघटना आणि शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला बाधा आणणारे निर्णय तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या आंदोलनात हीरालाल पगडाल, विशाल शिंदे, राहुल जरहाड, मोहम्मद कैफ, अनिकेत खरात, सोहम घुले, अभिषेक वैराळ, यश सानप, आदित्य वाघमारे, सुदर्शन रूपवते, रवींद्र सातपुते, राज वाकळे, शरद पवार, सार्थक फुलसुंदर यांच्यासह हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.
“शिक्षण विभागाने निर्णय मागे घेतल्याशिवाय छात्र भारती आंदोलनातून माघार घेणार नाही,” असा इशारा यावेळी अनिकेत घुले यांनी दिला.




