ताज्या बातम्या

दादासाहेब फाळके चित्रनगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वृक्षारोपण; ‘रामायण’ चित्रपटाच्या ट्रेलरचे केले अनावरणपूर्व दर्शन

मुंबई(मंगेश कवडे) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट देऊन विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी “एक झाड आईच्या नावाने” या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

त्यानंतर दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरातील प्राईम फोकसच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आगामी ‘रामायण’ चित्रपटाच्या संपूर्ण ट्रेलरचे विशेष दर्शन घेत चित्रपटाच्या तांत्रिक गुणवत्तेचे आणि भव्यतेचे कौतुक केले.

या प्रसंगी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी चित्रलेखा खातू-रावणंग यांच्यासह महामंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे चित्रनगरीतील आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असून, महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टी आणि अत्याधुनिक चित्रनिर्मिती तंत्रज्ञानाला बळकटी देण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेचा पुनरुच्चार झाला.

Scroll to Top