ताज्या बातम्या

साताऱ्यात पीडब्ल्यूडी ऑफिस मध्ये आता गाढवाची ही इंट्री..

सातारा(अजित जगताप ) : सातारा जिल्ह्यातील ठेकेदारांची पंढरी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पी.डब्ल्यू.डी.) सातारा कार्यालयात अनेक ठेकेदार, मजूर सहकारी संस्थेचे पदाधिकारी, राजकीय कार्यकर्त्यांचे नातेवाईक यांची वर्दळ असते. आता त्यामध्ये अचानक कार्यालयात एका गाढवाने एन्ट्री केल्यामुळे दिगंबरा.. दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. अशी देवाकडे धाव घेण्याची वेळ काही जणांवर आली आहे.
पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे बी अँड सी असा त्याचा उल्लेख होता बिल्डिंग अँड कंट्रक्शन असा त्याचा अर्थ होता. सध्या अनेक विकासाची कामे ही सार्वजनिक बांधकाम विभाग, जल संपदा, जीवन प्राधिकरण, वन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग अशा अनेक विभागामार्फत केली जातात.ज्या गावांमध्ये सार्वजनिक विकासाची कामे झाली आहेत. ते गाव जगाच्या नकाशावर आले आहे. त्यामुळे महत्वपूर्ण लक्षवेधी काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.
मार्च एंडिंग च्या गजबजलेल्या वातावरणात याच (पी.डब्ल्यू.डी.) कार्यालयात सर्वांचे लक्ष वेधून घेतले जाते. रात्री सुद्धा कार्यालयातच थांबून दिव्याच्या प्रकाशात रस्त्यावर दिवसा केलेल्या वर्षभरातील कामाचा लेखाजोखा मांडला जातो. अनेकांचे कंबरडे मोडले जाते. तर काहींना हिशोब लावताना टक्क्याटक्क्याने मांडणी करावी लागते. असे हे साताऱ्यातील सर्वाधिक लोकप्रिय व चर्चेत असणारे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे .
कालची घटना म्हणजे खऱ्या अर्थाने आता सार्वजनिक बांधकाम विभागाला आता सक्षम रखवालदाराची गरज निर्माण झालेली आहे. ना खाऊंगा ना खाने दूंगा.. असे भाजपचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेश दिला. या संदेशाची अंमलबजावणी करणारे साताऱ्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे खऱ्या अर्थाने समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चळवळीला मिळालेले यश मानले जाते. यामध्ये अतिशयोक्ती असू शकते. सर्वच भ्रष्ट कारभार नसतो तर काही ठिकाणी आशेचे किरण सुद्धा असते. हे येथील झाडाखालील पाराने अनेकदा अनुभवले आहे. या पारावर बसणारे सर्वच देशभक्त व सार्वजनिक उपक्रमाचा विचार करणारे आहेत. ठेका मिळाल्यानंतर गुणवत्ता राखली जाते. त्यामध्ये
प्रामाणिकपणाने सेवा देणारे व बांधकामात प्राविण्य मिळवणारे ठेकेदार सुद्धा असतात. कामवाटप समितीचे मोहरे सुद्धा अधून मधून या कार्यालया भेटतात.
जागतिक निसर्ग संवर्धन दिन मंगळवार दिनांक २८ जुलै रोजी दुपारच्या वेळेला चक्क साताऱ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोवई नाका येथील कार्यालयात भटकंती करत एक गाढव शिरले . प्रवेशद्वाराजवळ उभे राहून आशाळभूतपणाने आपल्यासाठी काही काम आहे का? आपले बिल मंजूर होईल का? जशा पद्धतीने गरजूवंत वाट बघतात तशा पद्धतीने वाट पाहत होते. परंतु, अखेर अडला माणूस धरी गाढवाचे पाय…. अशा पद्धतीने त्या गाढवाला विनंती करून काही प्राणीप्रिय लोकांनी बाहेर हाकलून दिले.
आदरणीय लोकप्रिय कलावंत दादा कोंडके यांनी एका चित्रपटात गीतातून म्हणून म्हणत्यात कायदा गाढव आहे रे… असं वाक्य म्हटले होते. त्याची यानिमित्त आठवण आली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बांधकाम करता येत नाही. असा कायदा आहे. पण अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे. त्या अर्थाने दादा कोंडके यांनी केलेला उल्लेख हा लक्षणीय ठरत आहे. सध्या गावात ढीगभर पुढारी आणि गुडघाभर खड्डे ?साचले आहेत. त्याची तर तक्रार करायला गाढव आले असावे .अशी ही विनोदाने चर्चा होत आहे.

———————————————

फोटो- साताऱ्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय प्रवेशद्वारा उभे असलेले गाढव (छाया- अजित जगताप, सातारा)

Scroll to Top