मलकापूर, दि. २४ जुलै : आषाढी एकादशीनिमित्त हौसाई विद्यालय, मलकापूर येथे भक्तिमय वातावरणात वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” आणि “पर्यावरण रक्षण ही काळाची गरज” असा प्रभावी जनजागृतीचा संदेश देत समाजप्रबोधन केले.
वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आदी संतांचे विचार आणि “पंढरीचा विठुराया सर्वांमध्ये आहे” हा मानवतेचा संदेश विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंग, अभंग आणि हरिनामाच्या गजरात साकारलेल्या दिंडीतून अधोरेखित केला.
या दिंडीत हौसाई विद्यालय, शामराव पाटील विद्यालय आणि हौसाई प्राथमिक विभागातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले. पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ऋषिकेश पोटे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्राचार्य सतीशकुमार सावळकर, मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी, पद्मावती मुळीक, बालाजी मुंडे, अंजली जानुगडे, चव्हाण सर, पवार मॅडम, रघुनाथ पाटील, सुधाकर कांबळे, महाडिक मॅडम, बालवाडी विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.




