ताज्या बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अजित अनंतराव पवार जयंतीनिमित्त अभिवादन

नवी मुंबई : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे अजित अनंतराव पवार यांच्या प्रतिमेस महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर श्री.दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनीही प्रतिमापूजन करून अभिवादन केले.

याप्रसंगी प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम.रूपाली भगत, श्रीम.शैला पाटील, पाणीपुरवठा समिती सभापती श्री.रविकांत पाटील, विधी समिती सभापती ॲड.सायली शिंदे, नगरसेविका ॲड. भारती पाटील, स्विकृत नगरसेवक श्री.बंडू केणी तसेच प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. दिग्विजय चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक श्री. राजेंद्र गाडेकर, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त डॉ.अमोल पालवे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, माजी नगरसेवक श्री.भरत जाधव तसेच श्री.इंदर शेंडगे, श्री. प्रसाद घोरपडे, श्री.अश्विन अगमकर, श्रीम. अनिता नायडू, श्रीम. कविता शास्त्री, श्री. संतोष आहेर, श्री.किरण कारंडे, श्री.आदित्य ढेबे आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

माजी उपमुख्यमंत्री श्री. अजित अनंतराव पवार यांचा जन्म दि.२२ जुलै १९५९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. आपले कर्तृत्व, निर्णयक्षमता, प्रशासनावरील पकड आणि विकासाभिमुख दृष्टीकोनामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी, कणखर आणि लोकप्रिय नेता म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांचा जनतेशी असलेला दृढ संपर्क, प्रभावी नेतृत्व आणि विकासकामांप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्यांना व्यापक लोकसमर्थन लाभले.

सन १९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून ते प्रथमच खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे सलग आठ वेळा प्रतिनिधित्व केले. श्री. अजित अनंतराव पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकूण सहा वेळा कार्यभार सांभाळला. याशिवाय त्यांनी वित्त व नियोजन, जलसंपदा, ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास, तसेच क्रीडा व युवक कल्याण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून कार्यक्षमतेने जबाबदारी पार पाडली. राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी ११ वेळेस विधान मंडळास सादर केला. तसेच जुलै २०२२ ते जून, २०२३ या काळात त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले.

त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांचा विकास, पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे, औद्योगिक गुंतवणुकीला चालना देणे, सिंचन प्रकल्पांना गती देणे आणि विकासाभिमुख प्रशासकीय निर्णय राबविणे यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले. प्रशासनातील त्यांची निर्णयक्षमता, कार्यतत्परता आणि विकासाभिमुख दृष्टी यामुळे त्यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत मोलाचे योगदान दिले.

राजकीय वर्तुळात तसेच जनसामान्यांमध्ये ते प्रेमाने ‘अजितदादा’ या नावाने ओळखले जात. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, कठोर परिश्रम, शिस्तप्रिय स्वभाव आणि विकासासाठीच्या अखंड धडपडीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर एक ठसा उमटवला. दि.२८ जानेवारी, २०२६ रोजी बारामती जि. पुणे येथे त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा माहितीफलक याठिकाणी प्रदर्शित करण्यात आला होता.

Scroll to Top