ताज्या बातम्या

वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या थकीत शुल्कप्रकरणी चौकशी समिती नेमणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : वरळी येथील ‘दी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’ संस्थेकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला देय शुल्क प्रकरणी सदस्यांनी मांडलेल्या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनानंतर १५ दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.

दी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया संस्थेकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला देय शुल्कबाबत विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य अनिल परब यांनी सहभाग घेतला. त्यास उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री देसाई यांनी सांगितले की, या प्रकरणी लोकलेखा समितीने केलेल्या सूचनांचे पालन करण्यात येईल; तसेच संस्थेच्या कामकाजाची, आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, महानगरपालिकेने यापूर्वी संबंधित संस्थेकडून ६६ कोटी रुपये व अनधिकृत बांधकाम प्रकरणी ११ कोटी रुपये वसुल केले आहेत. थकीत रक्कम टप्प्याटप्प्याने वसूल करण्यात येत आहे. संस्थेच्या व्यवहारांचे ऑडिट व चौकशी करून अहवाल तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश देण्यात येतील. लोकलेखा समितीच्या अहवालातील सूचनांनुसार; तसेच चौकशी अहवालाच्या आधारे कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Scroll to Top