मुंबई, ता. १ : राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत गौरवोद्गार काढले. “ज्येष्ठ, अभ्यासू, अष्टपैलू आणि अनुभवी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन अहिर यांची सर्वोच्च सभागृहाच्या उपसभापतीपदी झालेली बिनविरोध निवड ही सभागृहासाठी अभिमानाची बाब आहे,” असे सांगत त्यांनी विरोधी पक्षाचेही अर्ज मागे घेऊन सभागृहाच्या परंपरा जपल्याबद्दल आभार मानले.
शिंदे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष गुण असतात. आमच्या संघात आता आणखी एक “ऑलराऊंडर” आला आहे. गोलंदाज कोणताही असो, चेंडू कितीही वेगवान असो, सचिन अहिर हे षटकार मारल्याशिवाय थांबत नाहीत. जसे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर दिग्गज आहेत, तसेच राजकारण आणि समाजकारणात सचिन अहिर हेही आपल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. “एक सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाला, तर दुसऱ्या सचिनने जबाबदारीचे पॅड बांधून नव्या डावाला सुरुवात केली आहे,” असे म्हणत त्यांनी त्यांचे कौतुक केले.
उपमुख्यमंत्री म्हणाले की, २०१९ मध्ये शिवसेनेच्या उमेदवार म्हणून सचिन अहिर यांना आम्ही मतदान केले होते. आजही ते शिवसैनिक आहेत आणि उद्याही शिवसैनिकच राहतील. नीलम गोरे यांच्यानंतर पुन्हा एक शिवसैनिक या महत्त्वाच्या घटनात्मक पदावर विराजमान होत असल्याचा आनंद आणि अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
नीलम गोरे यांनी उपसभापती म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याचेही त्यांनी स्मरण केले. महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी प्रभावीपणे आवाज उठवला, अन्यायग्रस्तांपर्यंत पोहोचल्या आणि उपसभापतीपदाला वेगळी ओळख मिळवून दिली. विधान परिषदेची समृद्ध परंपरा सांगताना व्ही. एस. पागे, जयंतराव टिळक, शिवाजीराव देशमुख, रा. सु. गवई, फरांदे, डावखरे आणि नीलम गोरे यांसारख्या दिग्गजांनी या पदाची उंची वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन अहिरही ही परंपरा पुढे नेत सभागृहाचे पावित्र्य आणि डेकोरम कायम राखतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिंदे यांनी शायरीतूनही सचिन अहिर यांचे कौतुक केले.
“जो तूफानों में शांत रहे, उसे समंदर कहते हैं…
जो हर दिल पर राज करे, उसे सिकंदर कहते हैं…”
सचिन अहिर यांनी सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले असून त्यांच्या नेतृत्वामुळे सभागृहाचा मान, सन्मान आणि प्रतिष्ठा अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “दहीहंडीला अजून अवधी आहे; पण यशाची हंडी तुम्ही आजच फोडली आहे,” अशा शब्दांत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कामगार चळवळीतील सचिन अहिर यांचे योगदान अधोरेखित करताना शिंदे म्हणाले की, त्यांनी आयुष्यभर कामगारांसाठी संघर्ष केला, संघटना उभ्या केल्या आणि सत्तेचाही तसेच विरोधी पक्षात काम करण्याचाही अनुभव घेतला. त्यामुळे दोन्ही बाजूंचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांनी कधीही सभागृहात आक्रमकतेचा अतिरेक केला नाही; मात्र कामगारांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढा दिला आणि विधिमंडळातही सातत्याने त्यांचा आवाज बुलंद केला.
कामगारांविषयी असलेली त्यांची आस्था, जिव्हाळा आणि ममत्व यामुळे त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. वेतनवाढीसाठी केलेले प्रयत्न, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य कामगार संघ, माझगाव डॉक, महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या उद्योगांतील कामगारांच्या न्यायासाठी दिलेला लढा आणि गिरणगावातील जनाधार याचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाला समाजसेवेचे व्यासपीठ बनवून रक्तदान शिबिरे, आरोग्य उपक्रम, सामाजिक सेवा आणि गरजूंना मदत अशा अनेक उपक्रमांद्वारे सचिन अहिर यांनी समाजाशी नाळ कायम ठेवली असल्याचे शिंदे म्हणाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा मूलमंत्र त्यांनी आयुष्यभर पाळला असल्याचेही त्यांनी सांगितले.
तीन वेळा आमदार आणि राज्यमंत्री राहूनही सचिन अहिर यांनी समाजाशी असलेले नाते कायम ठेवले. मोठमोठ्या पदांवर गेल्यानंतरही त्यांनी सामान्य माणसांशी संपर्क तुटू दिला नाही. कष्ट, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कामगारांसाठी झटणारा कार्यकर्ता ते विधान परिषदेचे उपसभापती असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे शिंदे म्हणाले.
“लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणे, त्यांच्या व्यथा-वेदना समजून घेणे आणि स्वतःच्या इच्छा-आकांक्षांपेक्षा समाजाला प्राधान्य देणे यामुळेच लोक त्यांना नेता म्हणून स्वीकारतात,” असे सांगत त्यांनी मुंबईकरांमध्ये “आपल्या माणसाचा सन्मान झाला” अशी भावना असल्याचे नमूद केले.
सचिन अहिर यांनी सभागृहात नेहमीच मुद्देसूद मांडणी केली, विरोधकांचे प्रश्न गांभीर्याने मांडले आणि सत्तेत असताना देखील न्याय देण्याची भूमिका घेतली. परवा बेस्टच्या बैठकीत त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे सकारात्मक निर्णय होऊ शकला, याचाही उल्लेख त्यांनी केला.
उपसभापतीपदाच्या जबाबदारीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, या खुर्चीवर बसल्यानंतर पक्षापेक्षा नियम मोठे असतात, भावनेपेक्षा परंपरा मोठी असते आणि आवाजापेक्षा संयम मोठा असतो. हा नियम सत्ताधारी सदस्यांनाही लागू होतो. विरोधी पक्षालाही न्याय मिळाला पाहिजे, ही भावना कायम ठेवावी लागते. या खुर्चीवर पक्ष दिसता कामा नये; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि न्यायाची भूमिका दिसली पाहिजे. सचिन अहिर यांच्याकडे तो विवेक, अभ्यास, संयम आणि शुद्ध हेतू असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“आपण प्रामाणिकपणे काम करत राहा, सर्वांना न्याय द्या. सभागृहाला वाटले पाहिजे की उपसभापती सर्व सदस्यांना समान न्याय देतात,” असे सांगत त्यांनी सत्ता आणि विरोधक यांच्यात समतोल राखत संसदीय परंपरांचा सन्मान करण्याचे आवाहन केले.
शिवसेना परिवारातील एक सदस्य आज घटनात्मक जबाबदारी स्वीकारत असल्याचा मनस्वी आनंद असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केले. अडीच वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर आता सरकार एक टीम म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने पुढे नेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पायाभूत सुविधा, विकास प्रकल्प, मूलभूत सोयी-सुविधा आणि विविध जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला देशातील क्रमांक एक राज्य बनविण्यासाठी महायुती सरकार कार्यरत असल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षालाही विधायक सहकार्य करण्याचे आवाहन केले.
“जिथे चुका असतील तिथे नक्की प्रश्न विचारा; पण चांगल्या कामाला चांगले म्हणण्याची वृत्तीही ठेवली पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेत असल्याचा पुनरुच्चार करत शिंदे म्हणाले की, विरोधी पक्षाची संख्या कमी असली तरी त्यांच्या मान-सन्मानात कोणतीही कमतरता येऊ दिली जाणार नाही. आता उपसभापती म्हणून सचिन अहिर सर्वांना समान न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाषणाच्या शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आणखी एका शायरीने वातावरण भारावून टाकले.
“उड़ान वाली चिड़िया को कहाँ मालूम होता है कि जमीन से जुड़े रहने का मज़ा क्या होता है…
जो आसमान छूकर भी अपनी ज़मीन नहीं भूलते, जनता के दिलों पर राज बस वही करते हैं.”
या शब्दांसह त्यांनी सचिन अहिर यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी विश्वास व्यक्त केला.




