मुंबई : बीएलओ ड्युटी अन्याय निवारण मंचाच्या वतीने गोरेगाव येथील नंदादीप हायस्कूलमध्ये आयोजित जाहीर सभेत शिक्षक भारती, संस्थाचालक, मुख्याध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी BLO/SIR ड्युटीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी, “आम्हाला शिकवू द्या” या मागणीसाठी शिक्षकांना संघर्ष करावा लागत असल्याचे दुर्दैवी असून हे शिक्षण विभागाचे अपयश असल्याची टीका केली.
शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात येणाऱ्या एफआयआरचा निषेध करत BLO/SIR कामामुळे शिक्षकांच्या आरोग्य, सुरक्षितता, प्रवास, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि शाळेच्या कामकाजावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. वैयक्तिक मोबाईलचा वापर, विमा संरक्षणाचा अभाव, अपमानास्पद वागणूक आणि कामाच्या कालावधीबाबतची अनिश्चितता यासह विविध १३ मुद्दे त्यांनी सभेत मांडले.
द शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष गिरीश सामंत यांनी न्यायालयीन लढा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले, तर विविध संघटनांनी शिक्षकांना BLO कामातून मुक्त करून पर्यायी यंत्रणा उभारण्याची मागणी केली. प्रशासनाने पुढील आठ दिवसांत चर्चेसाठी वेळ न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक भारतीने दिला.




