ताज्या बातम्या

वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीची मासिक सभा तहकूब; विकासाच्या महत्त्वाच्या विषयांवरील निर्णय रखडले

पनवेल(sabir shekh) : पनवेल तालुक्यातील वावेघर, दापिवली आणि वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीची जून महिन्याची मासिक सभा बुधवारी (दि. १७ जून २०२६) सकाळी १०.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. मात्र बहुतांश सदस्य अनुपस्थित राहिल्याने आवश्यक गणसंख्या पूर्ण न झाल्याने सभा तहकूब करण्यात आली. परिणामी ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवरील निर्णय पुन्हा एकदा रखडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सभेत शाळा व अंगणवाडी सुविधांचा आढावा, पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, पाईपलाईन दुरुस्ती, गटार सफाई, वृक्षारोपण, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, ग्रामपंचायत कार्यालय उभारणी, मानसूनपूर्व तयारी, वाढती अनधिकृत बांधकामे, कायदा व सुव्यवस्था तसेच ग्रामनिधीतील विकासकामे आणि खर्चाचा आढावा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे या सर्व विषयांवर कोणताही निर्णय घेता आला नाही.
ग्रामपंचायतीच्या करदात्या नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीला लोकप्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. गावाच्या विकासासाठी महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, उपसरपंच जगन्नाथ चव्हाण यांच्या पदासंदर्भातील महत्त्वाचा विषयही सभेपुढे येणार होता. मात्र सभा न झाल्याने हा निर्णयही पुढे ढकलण्यात आला. ग्रामसेविका विशाखा सोंडकर, सरपंच गीतांजली गुरुनाथ गाताडे तसेच उपस्थित ग्रामस्थांनी याबाबत खंत व्यक्त करत गावातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसभा आणि मासिक बैठका अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे मत व्यक्त करत उपसरपंच जगन्नाथ चव्हाण यांनी लोकसहभागातूनच सुंदर, सुरक्षित आणि नियोजनबद्ध गाव उभारता येईल, असा विश्वास व्यक्त केला. पुढील सभेत विकासकामांबाबत ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सभेला अनेक सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमागील कारणांबाबत विविध चर्चांना उधाण आले असून, काही स्थानिक राजकीय दबावामुळे सदस्यांनी सभेकडे पाठ फिरवल्याची चर्चा गावात रंगत आहे. मात्र याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सभेपुढील प्रलंबित प्रमुख विषय
सदस्यांच्या अनुपस्थितीसंदर्भातील अर्जांवर निर्णय
मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करणे
शासन निर्णय व परिपत्रकांचे वाचन
ग्रामपंचायतीच्या जमा-खर्चास मंजुरी
जन्म, मृत्यू व विवाह नोंदींचा आढावा
विविध उपसमित्यांच्या कामकाजाचा आढावा
स्वच्छ भारत अभियान, घरकुल योजना व रोजगार हमी योजनेचा आढावा
घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर वसुलीचा आढावा
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालावर चर्चा
बांधकाम परवानग्या, ना हरकत दाखले आणि ग्रामस्थांच्या अर्जांवर निर्णय
पुढील मासिक सभा २५ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावाच्या विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. ग्रामस्थांच्या हिताचे निर्णय वेळेत होण्यासाठी लोकप्रतिनिधींची उपस्थिती आणि जबाबदारीची जाणीव तितकीच महत्त्वाची असल्याचे मत यानिमित्ताने व्यक्त होत आहे. गावाच्या विकासाला गती देण्यासाठी पुढील सभेत महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक आणि ठोस निर्णय होतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Scroll to Top