ताज्या बातम्या

रिसर्च मेथोडोलॉजीवरील फॉग्सी-जोगी कार्यशाळा सागर येथे यशस्वी; मुंबईचे डॉ. सुनील तांबवेकर यांचे मार्गदर्शन

सागर (मध्य प्रदेश) : ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “रिसर्च मेथोडोलॉजी” या विषयावरील फॉग्सी-जोगी (FOGSI-JOGI) पीकसेप कार्यशाळेचे आयोजन सागर येथे करण्यात आले. या कार्यशाळेत सागर आणि परिसरातील सुमारे ५० डॉक्टरांनी सहभाग घेत संशोधन कार्यातील विविध बारकावे जाणून घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात जोगीच्या एडिटर-इन-चीफ डॉ. सुजाता दलवी यांच्या व्हिडिओ संदेशाने झाली. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधनाचे महत्त्व, तसेच गुणवत्तापूर्ण संशोधनाची आवश्यकता अधोरेखित केली.
या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते मुंबई येथील ख्यातनाम स्त्रीरोगतज्ज्ञ व राष्ट्रीय फॅकल्टी सदस्य डॉ. सुनील एकनाथ तांबवेकर होते. त्यांनी रिसर्च मेथोडोलॉजी, रिसर्च डिझाइन, डेटा संकलन, संशोधन निबंध लेखन व प्रकाशन प्रक्रियेतील विविध महत्त्वपूर्ण पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानाला उपस्थित डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ते अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगितले.
कार्यशाळेत डॉ. प्रशांत साहू, डॉ. प्रियनील बसु, डॉ. दीपाली जाट, डॉ. नवीन कांगो, डॉ. प्रवीण बावनकर, डॉ. विकास जैन, प्रा. मोहन आरैर आणि डॉ. सुमित रावत यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी संशोधन पद्धती, अभ्यास आराखडा, डेटा विश्लेषण, बायोस्टॅटिस्टिक्स, वैज्ञानिक लेखन, संशोधन पत्रांचे प्रकाशन आणि संशोधन नैतिकता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती दिली.
SOGS सागर सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. ज्योती चौहान यांनी सांगितले की, या कार्यशाळेमुळे सहभागी डॉक्टरांना एखाद्या साध्या वैद्यकीय प्रश्नाचे वैज्ञानिक संशोधनात रूपांतर कसे करता येते, याची सखोल समज मिळाली. तसेच नवीन माहिती शोधण्याची आणि संशोधन क्षेत्रातील कौशल्ये विकसित करण्याची संधीही या उपक्रमातून उपलब्ध झाली.
ही कार्यशाळा वैद्यकीय संशोधनाची गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि चिकित्सकांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत सहभागी डॉक्टरांनी व्यक्त केले.

Scroll to Top