मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघाच्या वतीने ५ ते ९ जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पर्यावरणपूरक गणेश मूर्तिकला स्पर्धा व प्रदर्शनीचा बक्षीस वितरण व समारोप समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रोहित जोशी, प्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे, संघाचे मुंबई महानगर अध्यक्ष अशोक कडू आणि मूर्तिकार संजय चिरनेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्रशांत मेस्त्री (सिंधुदुर्ग) व हर्षल सुर्वे (घाटकोपर), द्वितीय पुरस्कार मनीष नाक्ती (रायगड) व अजय कुंभार (सातारा), तर तृतीय पुरस्कार यश चोरघे (नालासोपारा) आणि अनिल वाघेला (मुंबई) यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय विविध मूर्तिकारांना प्रोत्साहन पुरस्कार, प्रमाणपत्रे व स्व. विष्णू अंबादास कडू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विशाल शिंदे यांनी नवोदित मूर्तिकारांना मार्गदर्शन करताना स्वतःची स्वतंत्र कलाशैली विकसित करण्याचा सल्ला दिला. रोहित जोशी यांनी पर्यावरणपूरक मूर्तींच्या प्रसारासाठी मूर्तिकारांनी संघटित होण्याचे आवाहन केले. अशोक कडू यांनी धर्म, कला, संस्कृती, पर्यावरण आणि रोजगार या पंचतत्त्वांवर आधारित संघटनेच्या कार्याचा आढावा घेत मूर्तिकारांनी संघटनेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या प्रदर्शनीत विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, सातारा आणि मुंबई उपनगरांतील सुमारे ७५ मूर्तिकारांनी सहभाग नोंदवला. नागपूरच्या पर्यावरणप्रेमी अनुसया छाबराणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. परीक्षक म्हणून शिल्पकार संकल्प अशोक कुंभार आणि आर्ट डायरेक्टर नानासाहेब शेंडकर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण राऊत यांनी केले, तर संजय चिरनेरकर यांनी आभार मानले. या उपक्रमाचे आयोजन संघाचे अध्यक्ष अशोक कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.




