ताज्या बातम्या

उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर २९ आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी; सामाजिक कार्यकर्त्या दिव्या ढोले यांची मागणी

मुंबई : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र विधानसभेतील अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या सर्व २९ आमदारांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून आपली स्पष्ट भूमिका समाजासमोर मांडावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या दिव्या ढोले यांनी केली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे ही मागणी करत अनुसूचित जाती समाजाच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिव्या ढोले यांनी म्हटले आहे की, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न हा केवळ आरक्षणाच्या वाटपाचा विषय नसून तो राज्यातील अनुसूचित जातींच्या ५९ समाजघटकांच्या वर्तमान, भविष्य, हक्क, प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्यायाशी संबंधित असलेला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे या प्रश्नावर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व आमदारांनी मौन सोडून स्पष्ट भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, उपवर्गीकरणाबाबत समाजात विविध मतप्रवाह आहेत. काही समाजघटक या मागणीच्या समर्थनात आहेत, तर अनेक संघटना आणि समाजघटक त्यास विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघांतून निवडून आलेल्या आमदारांनी शासनासमोर कोणती भूमिका मांडली आहे, हे समाजाला कळणे आवश्यक आहे.
“आज प्रश्न उपवर्गीकरण व्हावे की होऊ नये एवढाच नाही, तर या विषयावर अनुसूचित जातींच्या २९ आमदारांचे नेमके मत काय आहे, हे समाजासमोर यायला हवे,” असेही त्यांनी म्हटले आहे. संबंधित आमदारांनी पक्षीय राजकारणाच्या चौकटीपलीकडे जाऊन समाजाच्या हिताच्या दृष्टीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पावसाळी अधिवेशनात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न उपस्थित करून शासनाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करताना, “समाजाने २९ आमदार निवडून दिले आहेत; त्यामुळे समाजाला २९ही आमदारांची भूमिका ऐकण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता मौन नव्हे, तर स्पष्ट उत्तरांची वेळ आली आहे,” असे दिव्या ढोले यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Scroll to Top