ताज्या बातम्या
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ – ॲड. आशिष शेलारसमाजसेवेच्या निःस्वार्थ प्रवासाला मानाचा मुजरा; पत्रकार बाळकृष्ण कासार यांना ‘सर्वोत्कृष्ट समाजसेवक – २०२६’ पुरस्काराने सन्मानितज्येष्ठाना बेस्ट मध्ये सवलतीच्या दरात प्रवास होणार…. सुरेश पोटे (फेस्कॉन )श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर (मुंबई ) येथे मित्र पक्ष ग्रुप आयोजित कलगी तुरा दोन नामांकित शाहिरांचा महामुकबला….छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सहा दिवसांत ४.३५ लाख नागरिकांना लाभ

आदर्श शिक्षक, यशस्वी व्यावसायिक, संगीतकार आणि ज्येष्ठ समाजसेवक कन्होजी मोरे गुरुजी यांचे निधन

गुहागर : मिळणंद गावचे सुपुत्र, आनंदवाडीतील पहिले शिक्षक, ज्येष्ठ समाजसेवक तथा बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले कन्होजी धोंडू मोरे (मोरे गुरुजी) यांचे ३० मे २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते सुमारे ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित पुत्र, एक विवाहित कन्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी मिळणंद, गुहागर आणि आजीवली परिसरात कार्य करत अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविले. उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग कायम ठेवला.
शिक्षकी पेशासोबत त्यांनी शेती, किराणा व्यवसाय, शिलाईकाम आणि बांधकाम क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. आनंदवाडीतील रखडलेले ‘आनंदविहार’ बांधकाम पूर्णत्वास नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच शासनाकडून निधी मिळवून सार्वजनिक विहीर उभारण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला.
मोरे गुरुजींना संगीताची विशेष आवड होती. गायन, पेटीवादन आणि नाट्यसंगीत क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. १९८५ मध्ये सादर झालेल्या ‘स्वप्नवेध’ या नाटकासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केले होते. त्यांच्या भारदस्त आणि कर्णमधुर आवाजाची आजही अनेकांना आठवण आहे.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आनंदविहार येथे विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवणी देण्याचे कार्य केले. गावातील सामाजिक सलोखा, न्यायनिष्ठ भूमिका आणि सर्वांशी प्रेमाने वागण्यामुळे त्यांना परिसरात विशेष मान होता.
त्यांच्या निधनाने आनंदवाडीसह संपूर्ण परिसराने एक आदर्श शिक्षक, समाजसेवक आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या कार्याची आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेची आठवण कायम प्रेरणादायी राहील.
दिवंगत कन्होजी धोंडू मोरे गुरुजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Scroll to Top