ताज्या बातम्या

नमुंमपा 51 प्राथमिक शाळांमध्ये पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या बालवाटिका 1 (नर्सरी) वर्गासाठी प्रवेश सुरु

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत 57 प्राथमिक शाळा आणि 23 माध्यमिक शाळा असून त्यामध्ये साधारणत: 48 हजार विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 5+3+3+4 अशी स्तर रचना करण्यात आलेली आहे.

यामध्ये पायाभूत स्तरात वयोगट वर्षे 03 ते 08 या अंतर्गत बालवाटिका 1,2,3 तसेच इयत्ता 1 ली व 2 री समाविष्ट आहे. पूर्वतयारी स्तरामध्ये वयोगट वर्षे 8 ते 11 असून इयत्ता 3 री, 4 थी, 5 वी समाविष्ट आहे.

पूर्व माध्यमिक स्तर वयोगट वर्षे 11 ते 14 असून या अंतर्गत इयत्ता 6 वी, 7 वी, 8 वी समाविष्ट आहे.

माध्यमिक स्तर हा वयोगट वर्षे 14 ते 18 चा असून यामध्ये इयत्ता 9 वी, 10 वी, 11वी व 12 वी समाविष्ट आहे.

शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 51 प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी माध्यम बालवाटिका 1 (नर्सरी वर्ग) सुरु करण्यात येत आहे. त्यासाठी शाळांमधून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. एका वर्गात 30 विद्यार्थी मर्यादा असून सर्व प्राथमिक शाळांमध्ये अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकवृंदाकडून इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा इमारती या अभ्यासासाठी उत्साह वाटेल अशा प्रसन्न असून तेथे सुरक्षित, स्वच्छ व बालमैत्रीपूर्ण वातावरण आहे. अभ्यासाप्रमाणेच त्याठिकाणी क्रीडा व कलागुणांच्या विकासाप्रमाणेच सर्वागीण प्रगतीवर भर दिला जाणार आहे.

बालवाटिका 1 (नर्सरी – इंग्रजी माध्यम) प्रवेशासाठी 3 वर्षे पूर्ण ते 4 वर्षे ही वयाची अट असून प्रवेशासाठी जन्मदाखला, पालकांचे आधार कार्ड, रहिवासाचा दाखला तसेच पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. मोफत प्रवेश, प्रशिक्षित शिक्षक आणि सुरक्षित वातावरण या त्रिसूत्रीच्या आधारावर गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच मुलांच्या सर्वांगीण विकासावरही भर दिला जाणार आहे.

तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पालकांनी नमुंमपाच्या शाळांमध्ये जाऊन आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करुन घ्यायचा आहे. महत्वाचे म्हणजे सर्व पालकांसाठी माध्यम निवडीचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दर्जेदार शिक्षण पुरविण्यात येत असून प्रवेशासाठी आपल्या परिसरातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत संपर्क साधावा, असे आवाहन नमुंमपा शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Scroll to Top