ताज्या बातम्या

कांजूरमार्ग येथील ६०२ बसथांब्यावर कचऱ्याच्या दुर्गंधीने प्रवासी हैराण; बसथांबा स्थलांतरित करण्याची मागणी

मुंबई : कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाजवळील पवईकडे जाणाऱ्या ६०२ क्रमांकाच्या बसच्या थांब्यावर सध्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बसथांब्यालगत निर्माण झालेल्या अनधिकृत कचरा साठ्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
स्थानिक प्रवासी आणि नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही दुकानदारांकडून तसेच इतरांकडून या ठिकाणी नियमितपणे कचरा टाकला जात असल्याने हा परिसर जणू कचरा कुंडीमध्येच रूपांतरित झाला आहे. दररोज हजारो प्रवासी या बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करत असताना त्यांना असह्य दुर्गंधी आणि अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना या समस्येचा अधिक त्रास होत असून आरोग्याच्या दृष्टीनेही ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे हा बसथांबा तातडीने स्वच्छ करून योग्य आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
याबाबत संबंधित प्रशासन, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

Scroll to Top