कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील सवादे येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी श्री. नितीन थोरात, सौ. विजया थोरात, सौ. वृषाली पाटील, सौ. स्वाती थोरात आणि सौ. पूजा काटवटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
विशेष म्हणजे, निवडणुकीत उमेदवारी देऊन चुरशीची लढत देणाऱ्या आणि अल्प मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांचाही गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद पाटील (आबा) तसेच जिल्हा परिषद सदस्य मा. उदयसिंह पाटील (दादा) यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला.
यावेळी बोलताना मंत्री मकरंद पाटील यांनी उदयसिंह पाटील यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. “प्रत्येक राजकीय पक्ष विजयी उमेदवारांचा सत्कार करतो; मात्र विजयी उमेदवारांसोबत पराभूत उमेदवारांचाही सन्मान करणारा हा आगळावेगळा उपक्रम आहे. निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया असून पराभूत उमेदवारांनीही पक्षासाठी व जनतेसाठी केलेले कार्य महत्त्वाचे असते. ही सकारात्मक परंपरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर राबविण्याचा प्रयत्न करेल,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, रयत संघटनेचे कार्यकर्ते, विविध गावांतील नागरिक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.




