ताज्या बातम्या

नामदेव पाटील काँग्रेसला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करुन देतील सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) : कोणत्याही आमिषाला, दबाव आणि दडपणाला बळी न पडता काँग्रेसला भक्कमपणे साथ देणारे नामदेव पाटील (आप्पा) यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते ही काँग्रेसची शक्ती आहे. जिल्हाध्यक्षपदी झालेली त्यांची निवड ही जिल्हा कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी असून नामदेव पाटील काँग्रेसला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करुन – देतील, असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सौ. सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे नुतन जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा आणि जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड याबद्दल सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात त्या हॉटेल सत्यजित विट्स, कराड येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठनेते अजितराव पाटील-चिखलीकर होते. कार्यक्रमास ओबीसी सेलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी, जि.प. सदस्या सौ. सुनंदा नामदेव पाटील, युवा नेते

इंद्रजीत चव्हाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूलराज पवार, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष मुबीन बागवान, महिला अध्यक्षा सुषमा घोरपडे, धनश्री महाडीक, कोल्हापूरचे श्रीकांत पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नामदेव पाटील यांचे कुटुंबीय व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदेव पाटील म्हणाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदावर काम करण्याची मिळालेली संधी हे एक आव्हान म्हणून मी स्विकारली आहे. सर्वांना बरोबर घेऊन आपले नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पक्ष पुन्हा मजबुत करण्यासाठी

आपला प्रामाणिक प्रयत्न राहील. काँग्रेस हा सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन सर्वधर्मसमभाव या तत्त्वाने चालणारा पक्ष आहे. पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.

अजितराव पाटील-चिखलीकर म्हणाले, पक्ष देईल ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडून यशस्वी करण्याची किमया नामदेव पाटील यांच्यात आहे. वारुंजीचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जि.प. सदस्य, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि आता जिल्हाध्यक्ष हा त्यांच्या यशाचा चढता आलेख गौरवास्पद आहे. नामदेव पाटील यांच्या रुपाने कराड दक्षिणमध्ये नेतृत्वाचा एक सक्षम पर्याय लोकांसमोर निर्माण झाला असून कराड दक्षिणची

सर्वसामान्य जनता त्यांच्यात पुढील आमदार पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भानुदास माळी, पं.स. सदस्य रवींद्र बडेकर, संग्राम पवार, वैशाली जावन यांनीही मनोगत व्यक्त केले. नामदेव पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. सुनंदा पाटील यांचा सौ. सत्वशिला चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्वागत जि.प.सदस्या सौ. सुनंदा पाटील व युवानेते सत्यजित पाटील यांनी केले. प्रास्ताविक सर्जेराव पाटील, सूत्रसंचालन विजय माने यांनी केले तर आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले. कार्यक्रमास महिलांची संख्या लक्षणीय होती. काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. सतेज पाटील, आ. विश्वजीत कदम, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह मान्यवरांनी दूरध्वनीवरुन तर उदयसिंह पाटील-उंडाळकर, अनिल देसाई, अविनाश मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नामदेव पाटील यांना भेटून त्यांचे अभीष्टचिंतन केले.

Scroll to Top