मुंबई : मुंबईतील टाटा स्मारक रुग्णालय येथे संयुक्त जयंती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचा सोहळा टाईम किपर ऑफिस परिसरात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना महिला नेत्या व माजी नगरसेविका स्नेहल जाधव उपस्थित होत्या. तसेच सिने दिग्दर्शक केदार शिंदे आणि ज्येष्ठ सिने कलाकार विजय पाटकर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. तसेच बाल कर्करोगाने ग्रस्त लहान रुग्णांना खेळणी वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
सदर कार्यक्रमाला रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संयुक्त जयंती समितीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.




