प्रतिनिधी : मनसेने अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते; मात्र भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर राज ठाकरे यांनी पानसे यांना माघार घ्यायला लावून भाजपला निवडणुकीसाठी ‘सशर्त’ पाठिंबा दिला आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी ही माहिती दिली.
कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्यामागे दूरगामी राजकीय गणित असल्याचा दावा त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन तारखेला रात्री शिवतीर्थवर येऊन राज यांच्यांशी चर्चा केली होती. या भेटीत फडणवीस यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज सकाळी निरंजन डावखरे ‘शिवतीर्थ’वर आले होते. त्यानंतर राज यांनी फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन पानसे यांना अर्ज न भरण्यास सांगितले.
फडणवीस यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्याबाबत राज यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी त्यांनी असे पुन्हा होणार नाही, असे सांगितले. आमचा पक्ष स्वतंत्र असून आम्हाला निवडणूक लढवता येत नाही, हे योग्य नसल्याचे राज यांनी फडणवीसांना सांगितल्यानंतर फडणवीस यांनी असे वारंवार घडणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
राजकारणात काही गोष्टींचा परिणाम लगेच दिसत नाही, काही गोष्टींचा फायदा कालांतराने होतो. मनसेच्या फायद्याचा विचार करुनच राज निर्णय घेतात. आताच्या निर्णयाचा फायदा काही दिवसांनी दिसून येईल, असा दावा सरदेसाई यांनी केला.