मुंबई(DDM न्यूज) : डिस्प्लेस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत केंद्र, ‘माझा सु संकल्प’ अभियान आणि करुणा सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटिझमग्रस्त मुलांसाठी मोफत “आतड्यांच्या आरोग्याचे मूल्यांकन व मायक्रोबायोम चाचणी” शिबिराचे आयोजन २६ एप्रिल रोजी माटुंगा (पूर्व) येथील The Mysore Auditorium येथे दुपारी १ ते सायं ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
हैदराबादस्थित या संशोधन संस्थेचे संस्थापक डॉ चंद्रशेखर थोंडुपुनुरी यांनी ऑटिझमच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करत “ऑटिझमची सुरुवात गर्भाशयातच होते, त्यामुळे लवकर निदान आणि प्रतिबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे सांगितले. त्यांनी आतडे-मेंदू (gut-brain axis) यावर आधारित उपचारपद्धतींवर भर देत फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन (FMT) ही पद्धत ऑटिझमग्रस्त मुलांमधील पचनाशी संबंधित समस्या कमी करण्यात उपयुक्त ठरत असल्याचा दावा केला.
या शिबिरात आतड्यांच्या सूक्ष्मजीव संतुलनाची तपासणी करून वैयक्तिक उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे. FMT उपचारपद्धतीद्वारे बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि अन्न असहिष्णुता यांसारख्या समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
संस्थेच्या मते, कृषी रसायनांचा गर्भावस्थेतील परिणाम आणि त्याचा मेंदूच्या विकासावर होणारा प्रभाव हा ऑटिझमच्या संभाव्य कारणांपैकी एक घटक असू शकतो. त्यामुळे गर्भधारणेपूर्व व गर्भावस्थेदरम्यान प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर संशोधन सुरू आहे. या पत्रकार परिषदेला आरोग्यदूत मंगेश चिवटे देखील उपस्थित होते.
शिबिरासाठी नोंदणी करण्यासाठी ८४३३५२९७६९ / ८४३३५२९४३५ / ९१०००६५५५२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




