
पुणे(मंगेश हरिश्चंद्र फदाले) : शिरूर तालुक्यातील जातेगाव खु. येथे नवीन ३३/२२ के.व्ही. विद्युत उपकेंद्रासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. जातेगाव खु. परिसरातील जनतेच्या अनेक वर्षांच्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने या नवीन उपकेंद्रास मान्यता दिली असून, त्यासाठी ११ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या उपकेंद्रांतर्गत ३३ केव्ही आणि २२ केव्हीच्या स्वतंत्र एचटी लाईन्सचे जाळे विस्तारले जाणार असल्याने परिसरातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होईल. तसेच, हे उपकेंद्र आधुनिक अशा ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टम’ ने सुसज्ज असणार आहे. यामुळे जातेगाव आणि परिसरातील वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड आणि कमी दाबाने मिळणाऱ्या विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असा मला विश्वास असल्याची प्रतिक्रिया माजी गृहमंत्री आणि आंबेगाव-शिरूर चे आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी ‘धगधगती मुंबई’ कडं व्यक्त केली.




