ताज्या बातम्या

साप्ताहिक ‘मावळ मराठा’चा २२वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न; पत्रकार विवेक भावसार यांचा गौरव

मुंबई : साप्ताहिक मावळ मराठाचा २२वा वर्धापन दिन सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकारिता व शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे धुळे जिल्ह्याचे सुपुत्र विवेक भावसार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रदीप म्हापसेकर, संपादक सदानंद खोपकर, सौ. सीमंत खोपकर, ‘एक वही एक पेन’ उपक्रमाचे निर्माते पत्रकार राजू झनके तसेच ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय मावळ मराठाचे वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संपादक सदानंद खोपकर यांच्या जिद्दीचे विशेष कौतुक केले. कठीण परिस्थितीतही सलग २२ वर्षे साप्ताहिक चालवण्याचा त्यांचा ध्यास प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले. कार्यक्रमात खोपकर यांच्या ‘रुणूक झुणूक’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच साप्ताहिकाच्या विशेष अंकाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
आपल्या मनोगतात खोपकर यांनी वृत्तपत्र चालवताना येणाऱ्या अडचणी व आव्हानांवर भाष्य केले. प्रमुख पाहुणे संदीप चव्हाण यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत आई वर आपलं जास्त प्रेम असल्याने त्याही विषयावर पुस्तक लिहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनीही मावळ मराठा वाचकांशी असलेले आपले नाते अधोरेखित केले.
पुरस्कारप्राप्त विवेक भावसार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मुंबईत आल्यानंतर सदानंद खोपकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि त्यातूनच आपली जडणघडण झाली. “साधे राहणे आणि उच्च विचारसरणी” हे खोपकर यांचे वैशिष्ट्य असल्याचे सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमंत खोपकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेंद्र खोपकर यांनी मानले. उत्साही वातावरणात हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला.
Scroll to Top