नवी मुंबई (ओमकार धुळप) : मा. महासंचालक, नवी दिल्ली व नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह (ठाणे) यांच्या वतीने गुरुवार दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सायं. ४.०० वा. कोपरखैरणे येथील माजी सरपंच स्व. गणपतशेठ फकीरजी नाईक मैदानावर हवाई हल्ला व ब्लॅकआऊट संदर्भात भव्य मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले.
या मॉकड्रीलला मा. आमदार Sanjay Kelkar (मुख्य क्षेत्ररक्षक, नागरी संरक्षण, ठाणे) तसेच स्थानिक नगरसेविका Bharati Patil हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शन उपनियंत्रक नागरी संरक्षण मा. विजय जाधव यांनी केले.
मॉकड्रीलमध्ये हवाई हल्ल्याची प्रात्यक्षिके, प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन (रेस्क्यू), हायराईज रेस्क्यू तसेच ब्लॅकआऊटचे प्रात्यक्षिक प्रभावीपणे सादर करण्यात आले. या उपक्रमात विविध विभागांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवण्यात आला. त्यामध्ये नागरी संरक्षणाचे १५४ स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी, ५० होमगार्ड जवान, नवी मुंबई महानगरपालिकेचे ११ कर्मचारी, आरोग्य विभागाच्या ४ रुग्णवाहिका पथके, कोपरखैरणे व वाशी अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस BDS टीम, TDRF पथक तसेच इतर महापालिकांचे कर्मचारी सहभागी झाले.
विशेष म्हणजे, पी.एम. श्री शाळेचे तब्बल १८३५ विद्यार्थी व कर्मचारी तसेच सुमारे २५०० स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मॉकड्रीलपूर्वी मातृबेन काशीबाई पटेल कॉलेज, ठाकुर्ली येथील स्वयंसेवकांनी सादर केलेले ९ मिनिटांचे पथनाट्य विशेष आकर्षण ठरले. यात नागरी संरक्षणाचे प्रशिक्षण का, कसे व केव्हा घ्यावे याबाबत जनजागृती करण्यात आली.
प्रात्यक्षिकानंतर Sanjay Kelkar यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सर्व सहभागी टीमचे कौतुक केले व अशा उपक्रमांमुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सज्जता वाढते, असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली, तर समारोप ‘वंदे मातरम्’ने करण्यात आला. सायंकाळी ७.०० वाजता तुलशी दर्शन सोसायटी परिसरात ब्लॅकआऊटचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष ब्लॅकआऊटही करण्यात आला.
या मॉकड्रीलमध्ये चारही उपमुख्य क्षेत्ररक्षक, १५ हून अधिक विभागीय अधिकारी व त्यांच्या उपविभागीय टीमने प्रत्यक्ष सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. निवडक छायाचित्रांसह सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला.




