ताज्या बातम्या

तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटवर युवासेनेची धडक; निष्काळजीपणावर जाब, गुन्हा दाखल करण्याची मागणी

मावळ (पुणे) : ता. मावळमधील इंदोरी येथील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये घडलेल्या दुर्दैवी अपघातानंतर युवासेनेने आक्रमक भूमिका घेत संस्थेवर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी बास्केटबॉल खेळताना पोस्ट कोसळून २० वर्षीय विद्यार्थी विशाल शर्मा याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
या घटनेची दखल घेत आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने युवासेना पदाधिकाऱ्यांनी संस्थेत धडक दिली. महाराष्ट्र विस्तारक निलेश वसंतराव बडदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-युवासेनेच्या शिष्टमंडळाने कॉलेज प्रशासनाला निष्काळजीपणाबाबत धारेवर धरले.
यावेळी युवासेनेने संस्थेकडे अनेक गंभीर मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले. बास्केटबॉल स्टँडची नियमित तपासणी (मेंटेनन्स) का करण्यात आली नाही, खेळाडूंसाठी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा का उपलब्ध नव्हती, तसेच कॉलेज कॅम्पसमध्ये आणि मैदानावर आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे का बसवले नव्हते, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. या घटनेचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याचेही समोर आले.
कॉलेज प्रशासनाने या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत दिलगिरी व्यक्त केली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले. तसेच मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना सहकार्य करत चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका मांडली.
दरम्यान, ही घटना कॉलेज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप करत संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवासेनेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. घटनेची सखोल चौकशी करून मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
या वेळी गौतम चाबुकस्वार, आशिष ठोंबरे, रमेश जाधव, अनिकेत घुले, शैलाताई खंडागळे, चेतन पवार, उमेश गावडे यांसह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top