ताज्या बातम्या

धारावीत जागतिक चिमणी दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून कृत्रिम घरटी रंगविण्याचा उपक्रम उत्साहात संपन्न

ुंबई (धारावी) : दरवर्षी २० मार्च रोजी साजरा केला जाणारा जागतिक चिमणी दिन यंदा धारावीत उत्साहात साजरा करण्यात आला. चिमण्यांचे घटते प्रमाण, त्यांच्या संरक्षण व संवर्धनाची गरज लक्षात घेऊन “स्पॅरोज शेल्टर” संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी चिमण्यांची कृत्रिम घरटी रंगविण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला.
हा कार्यक्रम दि. २० मार्च २०२६ रोजी मनोहर जोशी महाविद्यालय, धारावी बस डेपोजवळ, मुंबई येथे सकाळी ११ वाजता पार पडला. या उपक्रमात मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी तसेच जागरूक नागरिक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून कृत्रिम घरटी आकर्षक रंगांनी सजवली, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
रंगविण्यात आलेली ही घरटी महाविद्यालय व शाळा परिसरातील झाडांवर सुरक्षितपणे लावण्यात आली. तसेच त्या घरट्यांमध्ये चिमण्यांसाठी दाणा व पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली. “एक घरटे – एक विद्यार्थी” या संकल्पनेनुसार प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरट्याची काळजी घेणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
या प्रसंगी माजी आमदार बाबुराव माने, “स्पॅरोज शेल्टर”चे अध्यक्ष प्रमोद माने, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे,धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धूळप आणि कला शिक्षक विशाल जाधव हे मान्यवर उपस्थित होते.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या घराच्या खिडकीत किंवा अंगणात चिमण्यांसाठी दाणा व पाण्याची व्यवस्था करावी आणि या पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी केले.

Scroll to Top