ताज्या बातम्या

आई गावदेवी मंदिरासाठी पाटील परिवाराकडून साऊंड सिस्टिम भेट; ग्रामस्थांकडून कृतज्ञता व्यक्त

पनवेल(अमोल पाटील) : अजिवली गावातील धार्मिक आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देत पाटील परिवाराने आई गावदेवी मंदिरासाठी साऊंड सिस्टिम भेट देऊन भक्तांसाठी एक उपयुक्त आणि स्तुत्य उपक्रम राबविला आहे. वैकुंठवासी ह.भ.प. जनार्दन महाराज नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने ही साऊंड सिस्टिम मंदिराला अर्पण करण्यात आली.
ही भेट यमुनाबाई जनार्दन पाटील, ग्रुप ग्रामपंचायत अजिवलीचे माजी सदस्य सन्माननीय श्री. संतोषशेठ जनार्दन पाटील, सौ. धनश्रीताई संतोषशेठ पाटील, सौ. मयुरीताई किशोर मालकर आणि कु. प्रमोद जनार्दन पाटील यांच्या संयुक्त पुढाकारातून देण्यात आली. या उपक्रमामुळे मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन, आरती, उत्सव आणि विविध पारंपरिक सोहळे अधिक सुकर आणि प्रभावीपणे पार पडण्यास मदत होणार आहे.
अजिवली गावातील आई गावदेवी मंदिर हे ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान मानले जाते. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव, पूजा-अर्चा आणि सामुदायिक उपक्रम आयोजित केले जातात. अशा वेळी साऊंड सिस्टिमची आवश्यकता नेहमीच भासत होती. पाटील परिवाराने ही गरज ओळखून मंदिरासाठी साऊंड सिस्टिम भेट दिल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाटील परिवाराने केलेले हे योगदान केवळ एक भेटवस्तू नसून, गावच्या धार्मिक परंपरेशी असलेली नाळ आणि सामाजिक बांधिलकी याचे उत्तम उदाहरण असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. वैकुंठवासी ह.भ.प. जनार्दन महाराज नामदेव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ करण्यात आलेल्या या दातृत्वपूर्ण कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी आई गावदेवी मंदिर कार्यकारणी तसेच अजिवली ग्रामस्थांनी पाटील परिवाराप्रती मनःपूर्वक आभार व्यक्त केले. भविष्यातही अशाच प्रकारे गावातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
गावाच्या विकासासाठी आणि मंदिराच्या सुविधांसाठी अशा प्रकारचे सहकार्य प्रेरणादायी ठरत असून, पाटील परिवाराच्या या योगदानामुळे अजिवली गावाच्या सामाजिक ऐक्यालाही बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Scroll to Top