मुंबई : धारावी परिसरात भरदिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खांबदेव नगर येथील ९० फूट रोड परिसरात संसार हॉटेलच्या मागील गल्लीत ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास मुकुंद नगर येथील दोन युवक खांबदेव नगर परिसरात बसले होते. त्याचवेळी नशेच्या अवस्थेत असलेले दोन युवक तेथे आले आणि अचानक धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.
घटनेनंतर एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास धारावी पोलीस ठाणे करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
दरम्यान, खांबदेव नगर व ९० फूट रोड परिसरात अनेक ठिकाणी युवकांकडून खुलेआम अमली पदार्थांचे सेवन होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनीही ड्रग्सविरोधात आवाज उठवून संबंधितांना पकडून देण्यात मदत केली असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. “धारावीत अजून किती युवकांचा बळी जाणार आणि प्रशासन व लोकप्रतिनिधी ठोस कारवाई कधी करणार?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.




