ताज्या बातम्या

दररोज मजुरी करणाऱ्या ३७ विधवा महिलांचा साडी देऊन सन्मान;अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचा उपक्रम

कराड : जागतिक महिला दिनानिमित्त गोपाळनगर, ता. कराड येथे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या वतीने दररोज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ३७ विधवा महिलांचा साडी वाटप करून सन्मान करण्यात आला.
गोपाळनगर परिसरातील भटक्या जमातीतील अनेक मागासवर्गीय महिलांना कोणतीही शेती किंवा स्थिर उत्पन्नाचे साधन नसल्याने मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. अनेक कुटुंबांतील कर्ते पुरुष व्यसनाधीनतेमुळे अकाली निधन पावल्याने या महिलांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली आहे. अशा परिस्थितीतही कठोर परिश्रम करून कुटुंब चालवणाऱ्या या ३७ महिलांचा सन्मान म्हणून साडी वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रवीण काकडे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ) म्हणाले की, प्रत्येक महिलेनं संकटांना घाबरून न जाता ताठ मानेनं उभं राहून कष्टाने आपलं आयुष्य घडवावं. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. संकटांना सामोरं जात समाजाचं नाव उज्ज्वल करण्याची ताकद महिलांमध्ये आहे. तसेच महिलांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा आणि भीमाबाई आंबेडकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपल्या मुलांना सक्षम आणि सुशिक्षित बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला दिलीप जाधव (माजी ग्रामपंचायत सदस्य), विष्णू हुलवान (सोसायटी सदस्य), मानसिंग पवार, रविंद्र जाधव, अर्जुन जाधव तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Scroll to Top