ताज्या बातम्या

ठाणे कल्याण वरून महायुतीतीत मतभेद श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीचे काय ?

प्रतिनिधी  : ठाण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कल्याणची उमेदवारी जाहीर न करण्याचा निर्णय शिंदे गटानं घेतला आहे. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला जातो. ठाणे महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला. त्यानंतर शिवसेनेचा राज्यभर विस्तार झाला. त्यामुळे ठाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. तर दुसरीकडे या मतदारसंघातील ताकदीचा दाखला देत भाजपनं ठाण्यासाठी आग्रही मागणी केली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्याच्या जागेसाठी कमालीचे आग्रही आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंनी ८ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पण यात ठाण्याचा समावेश नाही. त्यामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता आहे. मुख्यमंत्र्यांना बालेकिल्ल्यातच संघर्ष करावा लागत असल्यानं शिवसैनिक अस्वस्थ आहेत. भाजपनं ठाण्यावर दावा सांगितल्यानं शिंदेसेनेत अस्वस्थतता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं ठाण्यातून विद्यमान खासदार राजन विचारेंना संधी दिली आहे. त्यांनी प्रचारदेखील सुरू केला आहे. पण ठाण्यात शिंदेंना अद्याप तरी तुल्यबळ उमेदवार मिळालेला नाही. सेनेच्या पहिल्या यादीत ठाणे, कल्याणचा समावेश नसल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानं भाजपला ठाणे मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्याची संधी मिळाली आहे. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्या माध्यमातून भाजपनं ठाण्यात वर्चस्व निर्माण केलं. पण एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु आणि सेनेचे ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख आनंद दिघेंनी मातोश्री गाठून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे ठाण्यासाठी हट्ट धरला. ठाकरेंच्या शब्दाला वजन असल्यानं भाजपला हा मतदारसंघ सोडावा लागला.
ठाण्याचा बालेकिल्ला सोडावा लागल्याची सल अजूनही भाजप नेत्यांच्या मनात आहे. जुना हिशोब चुकता करण्याची संधी साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे ठाणे शिंदेंना सोडण्यास भाजप तयार नाही. तर दुसरीकडे ठाण्यासाठी शिंदेसेनाही इरेला पेटली आहे. भाजपनं ताणून धरल्यास ठाणे राखून कल्याण सोडायचं हाच पर्याय सेनेपुढे आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी लटकली आहे.

आता ठाणे सोडल्यास भविष्यात विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत भाजप आक्रमक होईल. भाजपकडून शिवसेनेची ताकद कमी करण्याचे प्रयत्न करेल, अशी भीती सेनेच्या नेत्यांना वाटते. ठाण्यात भाजपची चांगली ताकद आहे. सहापैकी तीन आमदार भाजपचे आहेत. तर एका अपक्ष आमदाराचा भाजपला पाठिंबा आहे. या मतदारसंघात सेनेचे दोनच आमदार आहेत. खुद्द एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ ठाण्यात येतो.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top