Monday, December 16, 2024
घरमहाराष्ट्रसाताऱ्यातील लोकल बोर्ड इमारतीला मिळणार झळाळी…

साताऱ्यातील लोकल बोर्ड इमारतीला मिळणार झळाळी…



सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषद इमारतीच्या शेजारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निर्मितीपूर्वी लोकल बोर्ड इमारत म्हणून प्रसिद्ध असलेल्या इमारतीला हेरिटेज प्रॉपर्टी म्हणून झळाळी मिळणार आहे. भारतातील नामांकित अशा सावणी कंपनीच्या वतीने हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सातारा- कोरेगाव रस्त्यावरील जिल्हा परिषद इमारतीशेजारी असणाऱ्या लोकल बोर्ड इमारतीमध्ये पूर्वी कामकाज केले जात होते. त्यानंतर जिल्हा परिषदेची निर्मिती झाली. आणि या जुन्या इमारतीमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था, भूजल सर्वेक्षण व इतर कार्यालय तसेच नव्याने कॅन्टीन उभारण्यात आले होते. आता या हेरिटेज प्रॉपर्टीची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी वास्तुविशारद सुमित बगाडे कार्यकारी अभियंता एम. आय. मोदी, उपअभियंता एम.एच. पाटील व शाखा अभियंता फिरोज पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या एक मार्चपासून या कामकाजाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यात सातारा लोकल बोर्डाच्या इमारतीच्या छताची दुरुस्ती, तुळई बदल तसेच भिंतीची तोडफोड करून चांगल्या सुस्थितीत पुन्हा एकदा भिंती बांधून प्लास्टर करणे. अद्यावत ग्रंथालय, हॉल, दरवाजे- खिडकी, फ्लोरिंग, रोलिंग व ऐतिहासिक पार्श्वभूमी जतन करण्यासाठी सुमारे ७६ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे.
१९६० साली बांधण्यात आलेल्या या इमारतीला ७४ वर्षे पूर्ण झाली असून आणखीन किमान पन्नास वर्षे ते टिकून राहील. असे याचे बांधकाम आहे. सध्या भारत देशामध्ये नावलौकिक प्राप्त झालेल्या सावणी कंपनीमार्फत सुमारे तीस कामगार या इमारतीच्या कामासाठी झटत आहेत.
या कंपनीने आतापर्यंत मुंबईतील ताज हॉटेल ,मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, पुण्यातील कौन्सिल हॉल, मुंबई हाऊस ,बी.पी.सी.एल. कंपनी तसेच तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर व जेजुरी येथील देवालयाची ही हेरिटेज प्रॉपर्टी म्हणून देखभाल दुरुस्ती केलेली आहे.
सातारा लोकल बोर्ड इमारतीच्या दुरुस्ती व नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी जुना लुक दिसावा. अशा पद्धतीने कामकाज सुरू करण्यात आलेले आहे. दिवाळी पूर्वी या ऐतिहासिक व हेरिटेज इमारतीचे कामकाज पूर्ण होणार आहे. सातारच्या वैभवात भर टाकणाऱ्या या वास्तूमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वातंत्र्य सैनिक किसन वीर व अनेक मान्यवरांच्या आठवणी आहेत. त्या ग्रंथालयाच्या रूपाने जतन केल्या जातील. असे सांगण्यात आलेले आहे. केंद्र सरकारच्या पॅनलवर असलेल्या सावणी हेरिटेज कंपनी मार्फत हे काम सुरू असून सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाचीही दुरुस्ती याच कंपनीने केली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments