ताज्या बातम्या

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत ‘समकालीन संगम’ – अमूर्त कलेचा रंगीबेरंगी आविष्कार

उंडाळे : वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी ‘समकालीन संगम’ या भव्य चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. उंडाळे, ता. कराड येथील प्रसिद्ध चित्रकार किरण कुंभार, तसेच दिलीप माळी, विजय वाडेकर, पराग वनारसे आणि रसना भारद्वाज या चित्रकारांच्या समूह प्रदर्शनासह शर्वरी माळी यांच्या एकल चित्रप्रदर्शनाचा या प्रदर्शनात समावेश आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन नामवंत टेक्सटाईल डिझायनर डॉ. मेघश्याम गुर्जर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ चित्रकार विजयराज बोधनकर, चित्रकार-कवी मंगेश चोरगे, योजना विभागाचे डेप्युटी डायरेक्टर अभिषेक दुधगांवकर, कॅनविको हेल्थ केअरचे डायरेक्टर स्वप्नील कुलकर्णी, चित्रकार-शिल्पकार संजय कुंभार तसेच वाची आर्ट गॅलरीच्या संचालिका सुनीता संघाय यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रदर्शनातील अमूर्त शैलीतील चित्रे व शिल्पाकृती या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. वैशिष्ट्यपूर्ण रचना, समृद्ध रंगसंगती आणि पोताच्या वैविध्यातून प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र कलाभाषा ठळकपणे जाणवते. मानवी भावना, अंतर्मुख विचार आणि समकालीन सामाजिक जाणिवांचे प्रभावी प्रकटीकरण या कलाकृतींमधून घडल्याचे उद्घाटकांनी आपल्या मनोगतात नमूद केले.

‘समकालीन संगम’ हे चित्रप्रदर्शन १२ जानेवारी अखेर दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कलाप्रेमींसाठी खुले असून, अमूर्त कलेचा अनुभव घेण्यासाठी हे प्रदर्शन पाहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top