तळमावले/वार्ताहर :आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने संस्थेच्या तळमावले येथील मुख्य कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, सीईओ हेमंत तुपे, नितीन पाटील, संस्थेचे अन्य अधिकारी व इतर मान्यवर यांची उपस्थिती होती.
प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हार घालून, पुजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संतोष आंबी, सीईओ हेमंत तुपे, रविंद्र माने, डाॅ.संदीप डाकवे व इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार संपत देसाई, राजेश पाटील, रविंद्र माने, संदीप डाकवे, बाळासाहेब रोडे, पोपट माने, पोपट झेंडे, प्रमोद पाटील, विजय सुतार, नितीन बेलागडे, हरीश पेंढारकर, राजेंद्र पुजारी, संतोष आंबी यांचा शिवसमर्थ परीवाराच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. आकर्षक सन्मानपत्र, दिवाळी अंक, नवीन वर्षाची दिनदर्शिका, शाल आणि मिठाई देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होत. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी पोंभुर्ले या गावी झाला. त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी, 1832 रोजी सुरु केले. त्यामुळे 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप डाकवे, स्वागत सौ. स्वाती पाटील यांनी तर आशिष वीर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी, अधिकारी व अन्य मान्यवर यांनी विशेष परिश्रम घेतले.




