पनवेल(अमोल पाटील) : पनवेल महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पक्षाने खाते उघडत महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. प्रभाग क्रमांक १८ मधून नितीन जयराम पाटील यांची नगरसेवकपदी निवड झाली असून, या विजयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. “भारत माता की जय”, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून नितीन पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या विजयामुळे पनवेल महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, भाजपने आगामी काळात अधिक आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.




