सातारा(अजित जगताप) : नुकत्याच झालेल्या सातारा जिल्ह्यातील काही नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीने घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये एकमेकांचे उमेदवार निवडून आणणे व पाडण्याचे राजकारण झाले आहे. आता सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधीलच सत्ता संघर्ष पाहण्यास मिळणार आहे.
याबाबत माहिती अशी की, साताऱ्यात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजपने शिवसेनेचे एकनाथ शिंदे व अजित दादाच्या राष्ट्रवादीला रोखून धरले आहे. कराड सारख्या राजकीय जागरूक शहरांमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष व आ. डॉ. अतुल भोसले यांच्या नगराध्यक्ष उमेदवाराला पराभूत व्हावे लागले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री बाळासाहेब पाटील व शिवसेनेचे राजेंद्रसिंह यादव यांना यश मिळाले आहे.
फलटणमध्ये शिवसेनेच्या समवेत रामराजे नाईक निंबाळकर यांचा गड घडवून उद्ध्वस्त करून भाजपने राजघराण्यालाही धूळ चारली आहे. भाजपच्या व राष्ट्रवादी युतीने फलटण सारख्या राजकीय पारदर्शक शहरांमध्ये १८ ठिकाणी विजय संपादन केला आहे. तर शिवसेनेला केवळ नऊ जागेवर समाधान मानावे लागलेले आहे. या निकालाने भविष्यात महायुतीमध्येच संघर्ष पेटणार आहे.
सातारा जिल्ह्यातील दक्षिण काशी समजणाऱ्या वाई मध्ये मंत्री मकरंद पाटलांचा भाजपने पराभव केला असला तरी पाचगणी व महाबळेश्वर मध्ये भाजपला चितपट करून मंत्री पाटील यांनी आपली पाटील की शाबू ठेवून कमळाचे स्वप्न धुळीस मिळवले आहे.
माण तालुक्यातील म्हसवड नगरपालिकेला गोरे बंधूंचा करिष्मा कायम राखण्यात यश मिळाले आहे. त्याच पद्धतीने कोरेगाव येथील रहिमतपूर आणि जावळीतील मेढ्यात भाजपला शिवसेनेमुळे चांगले झुंजावे लागले आहे. यामध्ये महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबद्दल आता राजकीय द्वेष पसरला आहे. याची प्रचिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाहण्यास मिळणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या ७४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला कोंडीत पकडण्यासाठी महाआघाडी युती होऊन या निवडणुकीतील प्रत्येक मतदार याला चांगली किंमत मिळणार आहे. त्याची सुरुवात आतापासूनच झाली आहे . जे विजय झालेत त्यांच्यासाठी या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या असाही संदेश देण्यात आलेला आहे.
महायुतीच्या अंतर्गत निवडणूक व डावपेच्याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषद निवडणूक ही आता पुन्हा एकदा भाजपसाठी डोकेदुखी ठरणार की फायदेशीर? हे येणारा काळच ठरवेल.



