ताज्या बातम्या

ठेकेदार कैलास यादव विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करा! नगरसेवक किशोर पाटील आक्रमक वसई-विरारमध्ये बाजार शुल्कावरून रणकंदन!

विरार ( विवेक पाटकर ) : वसई-विरार शहर महानगरपालिकेने लागू केलेली अव्वाच्या सव्वा बाजार फी आणि त्यावरून ठेकेदाराकडून सुरू असलेली सक्तीची वसुली आता वादाच्या भोऱ्यात सापडली आहे. प्रभाग : १० चे नगरसेवक किशोर पाटील यांनी आज (१२ फेब्रुवारी) नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेत, बाजार फी वसुलीचा ठेकेदार कैलास यादव याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहे.

वसई-विरार महानगरपालिकेने ०१ जानेवारी २०२५ पासून बाजार शुल्काचे (मार्केट फी) नवीन दर लागू केले आहेत. मात्र, ही दरवाढ अत्यंत जास्त आणि अनपेक्षित असल्याचे सांगत, शहरातील छोटे व्यापारी, भाजी विक्रेते आणि कष्टकरी वर्गावर हा अन्याय असल्याचे नगरसेवक किशोर पाटील यांनी म्हटले होते. वाढत्या महागाईत ही दरवाढ सामान्य नागरिकांच्या रोजीरोटीवर गदा आणणारी असल्याने, ती तातडीने कमी करण्याची मागणी पाटील यांनी २१ जानेवारी २०२६ रोजी पालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती.

पाटील यांच्या पत्राची दखल घेऊन दरवाढ कमी करण्याऐवजी, पालिकेने या वसुलीसाठी ठेकेदार कैलास यादव याला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या बाजार फीची जबरदस्तीने वसुली करण्यासाठी ठेकेदार चक्क पालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही वसुली नसून एक प्रकारची लूट असल्याचा दावा करत, किशोर पाटील यांनी आज थेट पोलीस ठाणे गाठले. महापालिकेने स्थानिकांशी चर्चा करून मध्यम मार्ग काढणे अपेक्षित होते. मात्र, ठेकेदाराकडून केली जाणारी सक्ती ही खंडणीखोरीसारखी आहे. त्यामुळे कैलास यादव याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, असे निवेदन किशोर पाटील यांनी तुळींज पोलिसांना दिले आहे. आता या प्रकरणावर पोलीस आणि महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण वसई-विरारचे लक्ष लागले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top